Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा; उपचार सुरू असल्याची AIIMS च्या डॉक्टरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:10 PM2021-05-07T16:10:07+5:302021-05-07T16:10:39+5:30
Chhota Rajan Dies : छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे आज एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची अफवा आज दुपारी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी छोटा राजन जिवंत असल्याची माहिती दिली आहे. तिहार जेलमध्ये जेरबंद असताना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली होती. त्याला उपचारासाठी २६ एप्रिलला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सोमवारी तिहार तुरुंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली होती. (Gangster Chhota Rajan Tests Covid Positive.)
छोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. सोमवारी तिहारचे सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. कारण छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली आहे आणि त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
Underworld don Chhota Rajan is still alive. He is admitted at AIIMS for treatment of #COVID19: AIIMS official
— ANI (@ANI) May 7, 2021
(File photo) pic.twitter.com/gvAgKDuPqC
छोटा राजनविरोधात ७० हून अधिक प्रकरणे
छोटा राजनवर अपहरण, हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबंधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत. तसेच त्यांना पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याचबरोबर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले होते. तो १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटाचा आरोपी होता.