Dawood Brother Iqbal Kaskar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रूग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 11:45 AM2022-08-21T11:45:46+5:302022-08-21T11:46:08+5:30
सध्या तळोजा कारागृहात भोगतोय न्यायालयीन कोठडी
Dawood Brother Iqbal Kaskar: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इक्बाल कासकरलामुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक इक्बाल कासकरने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली. यानंतर त्याला ठाण्यातील तळोजा कारागृहातून मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इक्बाल कासकरला रुग्णालयाच्या 'आयसीयू'मध्ये ठेवण्यात आले आहे.
सध्या खंडणी प्रकरणी इक्बाल न्यायालयीन कोठडीत आहे. डी कंपनीचा सदस्य इक्बाल कासकर ठाण्याच्या तळोजा कारागृहात त्याची न्यायालयीन कोठडी भोगत आहे. अलीकडेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध FIR दाखल केला. एनआयएने UAPA च्या कलमांअंतर्गत या साऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला. ED ने मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईक यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही समावेश होता. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. ED दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे.
जून महिन्यात लखनौमध्ये इक्बाल कासकर विरोधात FIR नोंदवण्यात आला होता. जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव इक्बाल कासकर असल्याचे सांगण्यात आले. आधी त्याने दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बोलत असल्याचे सांगितले, नंतर दुबईतून बोलत असल्याचे सांगितले. वसीम रिझवी हिंदू झाल्याबद्दल अनेक कट्टर मुस्लिमांचा त्यांच्यावर राग असल्याचे बोलले जाते.
भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर जूनमध्ये इक्बाल सिंग कासकरचेही नाव पुढे आले होते. फोनवरून असभ्य संवाद करणाऱ्याने स्वत:ला इक्बाल सिंग कासकरचा माणूस सांगून मुस्लिमांविरुद्धचे वक्तव्य बंद करण्याची धमकी दिली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. त्यानंतर, प्रज्ञासिंह ठाकूर यांना धमकी मिळाली होती. त्यानंतर 'फोनवर धमकी न देता हिंमत असेल समोर या' असे आव्हान त्यांनी दिले होते.