सर्पदंशाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 09:59 PM2019-05-20T21:59:48+5:302019-05-20T22:01:41+5:30
भाईंदरच्या जोशी या सरकारी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने विलंब होऊन केंद्रेंचा मृत्यु झाल्याचे नातलगांनी सांगितले.
मीरारोड - काशिमीरा येथील डाचकुल पाड्यात राहणाऱ्या गोविंद मारु ती केंद्रे (३१) या तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. परंतु पोलीसांनी हद्दीचे निमित्त केल्याने आवश्यक पंचनामा आदींची पुर्तता होऊन मृताचा ताबा मिळण्यास उशीर झाल्याने नातलगांनी संताप व्यक्त केला. तर भाईंदरच्या जोशी या सरकारी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने विलंब होऊन केंद्रेंचा मृत्यु झाल्याचे नातलगांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या डाचकुल पाडा परीसरात मोठ्या प्रमााणात ना विकास क्षेत्र असूनही बेकायदा झोपडपट्टीचे साम्राज्य उभे राहिले आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने ठोस कारवाईच होत नाही. पुर्वीपासूनच हा जंगलपट्टा असल्याने येथे वन्यजीवांचा वावर असतो . याच भागात राहणारा गोविंद केंद्रे हा झोपेत असताना पहाटे दोनच्या सुमारास सापाने दमश केला. हात सुन्न पडला म्हणुन पाहिले असता मनगटामधून एका लहानशा छिद्रातून रक्त येत होते. नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांनी शासनाच्या भाईंदर येथील जोशी रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथे आवश्यक उपचाराची सोय नसल्याने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालय पाठवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी आठ वाजता केंद्रे याचा मृत्यू झाला .
काशिमीरा येथील खाजगी रुग्णालयाने केंद्रेला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यास सांगीतले. परंतु सरकार आणि पालिकेच्या कात्रीत अडकलेल्या या रुग्णालयात देखील केंद्रेंवर उपचार करण्यास नकार देत कांदिवलीला शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. वेळीच उपचार होण्यास झालेल्या उशीरा मुळे केंद्रेचा मृत्यु झाला. वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता असे त्यांच्या नातेवाईकांनी बोलुन दाखवले. उपचार वेळीच मिळाला नसताना दुसरीकडे मृत्युनंतर देखील केंद्रेची परवड काही थांबली नाही. अंत्यविधीसाठी मृतदेह ताब्यात घ्यायचा म्हणुन मयताचे नातेवाईक शताब्दी रु ग्णालय येथील तैनात पोलिसां कडे कागदपत्रे घेण्यासाठी गेले तर त्यांना काशीमिरा पोलीस ठाण्याकडून पंचनामा होईल व नंतर कागदपत्रे मिळतील असे सांगण्यात आले. तुम्ही काशिमीरा पोलीस ठाण्यात जा आणि ते येथे आल्यावर पंचनामा आदी करतील असे तेथील पोलीसांनी सांगीतल्यावर मृताचे नातलग काशिमीरा पोलीस ठाण्यात आले.
पोलीस ठाण्यात नातलग ताटकळत उभे असल्याचे पाहून शिवमावळा प्रतिष्ठानचे नामदेव काशिद आदी मदतीला धाऊन गेले. दुपारी तीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी शताब्दी रुग्णालय गाठले. मयताच्या पत्नीचा जबाब, पंचनामा आदी आवश्यक बाबींची पुर्तता केली. त्या नंतर मृतदेह ताब्यात मिळाला. जोशी रुग्णालयात उपचारास दिलेला नकार आणि पोलीसांकडून झालेल्या हद्दीच्या कारणांनी विलंब या बद्दल नातलगांनी संताप व्यक्त केला आहे.