दुर्दैवी घटना! बेरोजगारीला कंटाळून चौघांनी केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 14:52 IST2018-11-23T14:47:50+5:302018-11-23T14:52:24+5:30
मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.

दुर्दैवी घटना! बेरोजगारीला कंटाळून चौघांनी केली आत्महत्या
नवी दिल्ली - बेरोजगारीला कंटाळून राजस्थानमध्ये चार तरुणांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आपला जीव संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी मिळत नसल्याने चौघेजण हताश होते. घरच्यांना आपलं ओझं होऊ नये म्हणून या चौघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं आहे.
अलवार जिल्ह्यातील राजगड- रैनी या गावात राहणाऱ्या मनोज मीना (वय २४), सत्यनारायणन मीना (वय २२), रितूराज मीना (वय १७) आणि अभिषेक मीना (वय १८) या चौघांनी मंगळवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. या चौघांचे मित्र राहुल (वय १८) आणि संतोष (वय १९) हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासमोरच या चौघांनी ट्रेनसमोर उडी मारली. राहुल आणि संतोषने पोलिसांना ते चौघेही नोकरी मिळत नसल्याने चिंताग्रस्त असल्याची माहिती दिली. आपण कुटुंबावर ओझं म्हणून जगत असल्याची भावना त्यांच्या मनात आली होती. त्या चौघांनी संतोष आणि राहुलला देखील आत्महत्या करणार का असे विचारले. मात्र, त्या दोघांनी नकार दिला.
राहुल आणि संतोषच्या जबाबावरुन नोकरी नसल्याने ते चौघे निराश होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे दिसते. मात्र, आम्ही या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहे असे अलवारमधील पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले.