वरळीत सापडला अज्ञाताचा मृतदेह; दहा तासांत छडा लावून आरोपींना ठोकल्या बेडया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 09:21 PM2021-04-19T21:21:13+5:302021-04-19T21:21:50+5:30
Murder Case : वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी, पोलीस शिपाई स्वप्नील डेरे आणि पोलीस शिपाई स्वप्नील गुरव यांनी आपल्या कौशल्याने आणि इतर माध्यमातून हत्येचा तपास सुरु केला.
वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. या हत्येचा छडा वरळी पोलिसांनी अवघ्या दहा तासात लावला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून तिघांनी या व्यक्तीचा जीव घेतला असल्याचं उघड झालं. पहिल्या सहा तासात खुनातील पहिल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर खुनाच्या दहा तासात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. तिन्ही उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असून सद्दाम शाह (३५) आणि रवीकुमार गौतम (२५) अशी आरोपींची नावं आहेत. तर विधिसंघर्ष बालक १७ वर्षांचा आहे.
वरळी पोलीसच्या ठाण्याच्याहद्दीत काल सकाळी दहाच्या सुमारास एस के अहिरे मार्ग (खाऊ गल्ली) येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना खबरीमार्फत मिळाली. यानंतर वरळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, मृत व्यक्तीची ओळख पटवता आली नाही. परंतु अशा परिस्थितीतही वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी, पोलीस शिपाई स्वप्नील डेरे आणि पोलीस शिपाई स्वप्नील गुरव यांनी आपल्या कौशल्याने आणि इतर माध्यमातून हत्येचा तपास सुरु केला.
मोबाईल चोरीच्या संशयातून संबंधित व्यक्तीला एका कन्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांनी मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. या हत्येमध्ये एकूण तीन जणांचा सहभाग होता. सहा तासाच्या आत खुनाच्या पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यापैकी दुसऱ्या आरोपीला १० तासांच्या आत पकडून खुनाचा छडा लावण्यात वरळी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. अद्याप मृताची ओळख पटली नसल्याची माहिती कोळी यांनी दिली.