शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांचा गोळीबार; राजकीय वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 01:33 PM2021-01-03T13:33:17+5:302021-01-03T13:33:48+5:30
Bhiwandi : सुदैवाने या घटनेत शाखाप्रमुख व त्यांची पत्नी या हल्ल्यात बचावले असून राजकीय वादातून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी : भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. सुदैवाने या घटनेत शाखाप्रमुख व त्यांची पत्नी या हल्ल्यात बचावले असून राजकीय वादातून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. दिपक म्हात्रे असे गोळीबारात बचावलेल्या शिवसेना शाखा प्रमुखाचे नाव असून हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दिपक म्हात्रे हे उमेदवार असून मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी येत असताना अचानक यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तीन वेळा गोळीबार केला. मात्र सुदैवाने या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोघा अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वादातून काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या झाली होती, त्यांनतर आता पुन्हा ऐन ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत सेनेच्या शाखाप्रमुखवर गोळीबार झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या तपासासाठी रात्रीपासूनच विशेष पोलीस पथक नेमून अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र वाणी यांनी दिली आहे.