बंदुकीच्या गोळ्या झाडून अज्ञात इसमाची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 07:02 PM2021-09-12T19:02:18+5:302021-09-12T19:02:42+5:30
Crime Case : मृतक अनोळखी असल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३२ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे (ता.मालेगाव) गावानजीकच्या शेतात १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह अधिकाºयांनी भेट देऊन तपास सुरू केला. दरम्यान, मृतक अनोळखी असल्याने या घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पांगरीकुटे शेत शिवारात स्त्यालगतच्या एका शेतात अंदाजे ३३ वर्षीय इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मालेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आपल्या ताफ्यासह ठाणेदार धुमाळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केली असता, मृतकाच्या कपाळावर आणि छातीत बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मृतक अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ही हत्या का, कधी व कुणी केली, हत्येमागील कारणांचा उलगडा करण्याकामी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकालादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एम. जाधव आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. कपाळावर बंदुकीची गोळी झाडल्याने मृतकाचे चेहरा स्पष्ट ओळखू येत नाही. इसमाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.