सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांची अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:57 AM2020-09-01T03:57:22+5:302020-09-01T03:58:06+5:30
पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या.
मुंबई : सिगारेटची तलफ भागविण्यासाठी कॉलेज तरुणांनी दुकानदारालाच चुना लावला. पेटीएमद्वारे पैसे पाठविल्याचे सांगून, ते स्वत:च पैसे ट्रान्सफर झाल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर पाठवत होते. पासबुकमधील नोंदीतून तरुणांचे बिंग फुटले.
ओशिवरा पोलिसांनी तरुणांना अटक केली आहे. जिमित पांचाळ (२०), अपूर्व गोहील (२२), भाविक पडियार (२२), सागर गाला (२४), निसर्ग मस्करिया (१९) अशी अटक तरुणांची नावे आहेत.
पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या.
दुकानदाराला पेटीएमने पैसे पाठवतो सांगून, विविध मोफत संकेतस्थळांवरून संदेश तयार करून दुकानदाराच्या मोबाइलवर पैसे पाठविल्याचे संदेश धाडायचे.
पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर ही मंडळी अशाच पद्धतीने दुकानदाराला गंडा घालत होती. ग्राहकांच्या गर्दीत दुकानदारानेही त्याकडे जास्त लक्ष दिले नाही.
मात्र नुकतेच पासबुक नोंदी केल्यानंतर तरुणांनी पैसेच पाठविले नसल्याचे समोर आले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत, पाचही तरुणांना पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.