शेतात दूध आणण्यासाठी गेला, समोरील दृश्य पाहून तो हादरला; यवतमाळमधील भयावह घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 02:17 PM2023-01-17T14:17:48+5:302023-01-17T14:20:02+5:30

अशोक अक्कलवार यांचे कळमनेर शिवारात शेत आहे.

Unknown assailants killed a farmer in Yavatmal by throwing a stone on his head. | शेतात दूध आणण्यासाठी गेला, समोरील दृश्य पाहून तो हादरला; यवतमाळमधील भयावह घटना

शेतात दूध आणण्यासाठी गेला, समोरील दृश्य पाहून तो हादरला; यवतमाळमधील भयावह घटना

googlenewsNext

यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगडी वरवंटा टाकून खून केला. ही गंभीर घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. दरम्यान, कळंब तालुक्यातही सोमवारी ८.३० वाजता इंदिरा चौकात युवकाची हत्या करण्यात आली. जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

अशोक धनंजय अक्कलवार (६५) रा. शांतीनगर, राळेगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अशोक अक्कलवार यांचे कळमनेर शिवारात शेत आहे. त्या शेतातील बंड्यात ते नेहमी जागल करण्यासाठी जात होते. रविवारी रात्री ते शेतात जागल करण्यासाठी गेले. सकाळी ८ वाजता त्यांचा मुलगा समीर शेतातून दूध आणण्यासाठी तेथे गेला. मात्र, त्या ठिकाणचे दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला. 

समीरचे वडील रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडून होते. कुणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी दगडी वरवंटा अशोक अक्कलवार यांच्या डोक्यात घातला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून हादरलेल्या समीरने धीर धरत याची माहिती राळेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले.

शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा खून झाल्याची वार्ता सोमवारी दुपारपर्यंत पंचक्रोशित पोहोचली. सर्वांनाच पिकाच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी शेतात जागल करावी लागते. आता या घटनेने रात्री शेतात जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खून कुठल्या कारणाने झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.

१६ दिवसात दहा जणांचा मर्डर-

जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. १६ दिवसांत दहा खून झाले असून, यामध्ये कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे आढळून आले. पती-पत्नीतील वाद, मालमत्तेचा वाद तर कुठे अवैध व्यवसायातील वर्चस्वाची लढाई अशा प्रकारच्या कारणांनी या घटना घडल्या.

Web Title: Unknown assailants killed a farmer in Yavatmal by throwing a stone on his head.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.