Unnao Rape Case : कुलदीप सेंगरने सुनावलेल्या शिक्षेला दिले आव्हान, हायकोर्टाने सीबीआयला पाठवली नोटीस
By पूनम अपराज | Published: November 6, 2020 06:31 PM2020-11-06T18:31:54+5:302020-11-06T18:32:47+5:30
Unnao Rape Case: या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला.
उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात शिक्षा झालेल्या माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. दिल्ली हायकोर्टाने आता या प्रकरणात सीबीआयला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
ट्रायल कोर्टाच्या आदेशास कुलदीप सेंगर यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणात कुलदीप सिंग सेंगरसह एकूण सात दोषींना दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने दहा लाख रुपये दंडही ठोठावला. आता या प्रकरणाची सुनावणी 10 नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणात कुलदीप सेंगर यांचे उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यत्व 25 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. ज्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात न्यायालयाने कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर पाच जणांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची चौकशी करणार्या सीबीआयने मोठी कारवाई केली. या प्रकरणात सीबीआयने जिल्ह्यातील तत्कालीन उच्च अधिकाऱ्यांना दोषी धरले होते. सीबीआयने आयएएस आदिती सिंग, आयपीएस पुष्पांजली सिंग आणि नेहा पांडे यांना या प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल दोषी ठरवत विभागीय कारवाईची शिफारस केली.
Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय
3 डिसेंबर 2019ला उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.