Video: एनकाउंटरच्या भीतीने जावेदने केले सरेंडर; बदायूं हत्याकांडाचे खापर भावावर फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 03:40 PM2024-03-21T15:40:48+5:302024-03-21T15:41:29+5:30

दोन लहान मुलांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीचा एनकाउंटर केला, तर भीतीपोटी दुसऱ्याने सरेंडर केले.

UP Badaun Murder Case: Javed Surrendered Fearing Encounter; he blamed his brother for Badaun murder | Video: एनकाउंटरच्या भीतीने जावेदने केले सरेंडर; बदायूं हत्याकांडाचे खापर भावावर फोडले

Video: एनकाउंटरच्या भीतीने जावेदने केले सरेंडर; बदायूं हत्याकांडाचे खापर भावावर फोडले

UP Badaun Murder Case: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये आयुष आणि अहान, या दोन लहान मुलांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मारेकरी साजिदला चकमकीतच ठार केले. मात्र, त्याचा भाऊ जावेद घटनास्थळावरुन फरार झाला होता. आता, काल(दि.20) रात्री उशिरा आरोपी जावेदने बरेली येथील पोलीस चौकीत जाऊन आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी जावेदचा एक व्हिडिओही बनवण्यात आला, ज्यामध्ये तो स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत आहे.

काय म्हणाला आरोपी जावेद?
व्हिडिओमध्ये जावेदने, या हत्येचा मुख्य सूत्रधार आपल्या मोठा भाऊ साजिद असल्याचे म्हटले आहे. तसेच, तो स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत आहे. जावेद म्हणाला की, “घटनेनंतर मी आधीच बदायूंमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी जाणार होतो, पण तिथे लोकांची मोठी गर्दी जमली होती. ते मला मारतील, या भीतीपोटी मी दिल्लीला पळून गेलो आणि तेथून बरेलीला येऊन आत्मसमर्पण केले."

"ज्या दोन मुलांची हत्या झाली, त्यांच्या घराशी आमचे चांगले संबंध आहेत. साजिदने असे का केले, हे मला माहीत नाही. मला स्वतःला नंतर कळले. माझ्या मोबाईलवर साजिदने गुन्हा केल्याचे मेसेज केले. त्यामुळे मी घाबरलो आणि पळून गेलो. साजित संगिताच्या घरी का जात आहे, हे त्याने मला सांगितले नव्हते. साजिदने जे काही केले, त्याच्याशी माझा संबंध नाही. साजिद माझा भाऊ आहे, पण तो मला कधीही काहीच सांगत नसायचा. तो कधी-कधी छोट्या गोष्टींवरून लोकांशी भांडण करायचा, पण इतका मोठा घोळ करेल, याची मला कल्पनाही नव्हती," अशी प्रतिक्रिया जावेदने दिली.

पोलिसांचा तपास सुरू
सध्या जावेद पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मृत मुलांची आई संगिताचे म्हणणे आहे की, या हत्येमध्ये जावेदचाही हात आहे. हत्येच्या दिवशी जावेद आणि साजिद, दोघेही त्यांच्या घरी आला होते. साजिदने माझ्याकडे पाच हजार रुपये मागितले. मी पैसे घेण्यासाठी खोलीत गेल्यावर साजिद माझ्या मुलांना घेऊन गच्चीवर गेला आणि तिथे त्यांचा निर्घृण खुन केला. घटनेवेळी साजिद तिथेच गेटबाहेर उभा होता.

दुसरीकडे, मुलांचे वडील विनोद यांचेही म्हणणे आहे की, खुनाच्या वेळी जावेदही त्यांच्या घरी आला होता. विनोद यांनी सुपारी किलिंगचा संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, साजिद आणि जावेद, या दोघांशीही आमचे वैर नव्हते. माझ्या मुलांना मारण्यासाठी या दोघांना कोणीतरी सुपारी दिली असावी. साजिदला जशी शिक्षा झाली, तशीच शिक्षा जावेदला मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title: UP Badaun Murder Case: Javed Surrendered Fearing Encounter; he blamed his brother for Badaun murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.