UP Crime News: लिफ्ट, बलात्काराचा प्रयत्न, हत्या आणि एन्काउंटर; वाचा उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:55 PM2022-04-20T12:55:38+5:302022-04-20T12:55:38+5:30
UP Crime News: उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता कौशांबी जिल्हा पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्याची घटना घडली आहे.
कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून चकमकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यूपी पोलिसांनी तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न आणि हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या आहेत. आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या घातल्या असून, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
करारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधार गावातील एक तरुणीचे घरात भांडण झाल्यानंतर, ती पायी चालत आपल्या बहिणीच्या घराकडे निघाली. 16 एप्रिल रोजी ती घरातून निघाली, पण बहिणीच्या घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच न सापडल्याने त्यांनी करारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरीपीने दिली लिफ्ट...
पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी राजेंद्रने मुलीला आपल्या गाडीवरुन लिफ्ट दिली होती. मुलगी त्याच्यासोबत दुचाकीवर बसली. अंधाराचा फायदा घेत राजेंद्रने तिला चिल्ला शाहबाजी गावाजवळील बागेत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावर तरुणीने आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबून खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून पळ काढला.
चकमकीत दोन्ही पायांना लागल्या गोळ्या
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ती राजेंद्र नावाच्या तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळाली. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी जात होते, पण आरोपीने पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन प्रयागराजला पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने त्याच्याकडील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, यात त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या.