८ कोटींची जमीन अन् लग्नानंतर २ तासांत पतीचा मृत्यू; माजी आमदाराचं षडयंत्र उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 07:09 PM2023-11-05T19:09:24+5:302023-11-05T19:10:02+5:30

ही कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेकडे पाहावे लागेल.

UP Former MLA Pawan Pandey Arrested For Grabbing Land Worth Crores Through Fraud and Murder | ८ कोटींची जमीन अन् लग्नानंतर २ तासांत पतीचा मृत्यू; माजी आमदाराचं षडयंत्र उघड

८ कोटींची जमीन अन् लग्नानंतर २ तासांत पतीचा मृत्यू; माजी आमदाराचं षडयंत्र उघड

लखनौ – लालसेपोटी षडयंत्र रचले जातात आणि त्यानुसार गुन्हा घडवला जातो अशा कथा तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिल्या असतील. आम्‍ही तुम्‍हाला अशीच एका चित्रपटासारखीच एक खरी कहाणी सांगत आहोत, जिथे एका माजी आमदारावर त्‍यांच्‍या सहकार्‍यांसह एक कट रचल्‍याचा आरोप आहे, जेथे ८ कोटी रुपयांच्‍या जमिनीसाठी केवळ बनावट कागदपत्रेच तयार केली गेली नाहीत, तर खोटे लग्नही लावण्यात आले आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीचा खून करण्यात आला. या प्रकरणी माजी आमदार पवन पांडे यांना शुक्रवारीच यूपी एसटीएफने अटक केली आहे.

ही कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेकडे पाहावे लागेल. या घटनेत नसीरपूर बरवा येथील अजय सिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. मंदिरात लग्न करून घरी परतत असताना ही घटना घडली. या अपघाताच्या २ तासांपूर्वी अजयचे लग्न नीतू सिंहसोबत झाले होते. त्यानंतर अजय सिंहच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेला एफआयआर सर्वांना हैराण करणारा होता. अजय सिंहच्या लग्नासाठी बनावट लग्न प्रमाणपत्र बनवण्यात आले. त्यानंतर २ तासांत त्याचा संशयास्पदरित्या अपघातात मृत्यू दाखवण्यात आला असा हा आरोप होता.

लग्न झालेल्या मुलीनेही अपघाताच्या दोनच दिवसांपूर्वी अजय सिंह यांची पत्नी म्हणून पालिकेच्या कौटुंबिक रजिस्टरमध्ये नाव नोंदवले होते. अजयच्या आईला संशय आला. यानंतर ती आणखी काही चौकशी करत असतानाच दुसरी बातमी आली. रस्त्याच्या कडेला असलेली त्यांची २८ एकर जमीन, ज्याची किंमत सुमारे ८ कोटी रुपये होती, ती मुकेश तिवारी याला फक्त २० लाख रुपयांना दिली गेली होती. हा करारही दुर्घटनेच्या सुमारे दोन महिने आधी २५ ऑगस्ट रोजी झाला होता. मुकेश तिवारी हे माजी आमदार पवन पांडे यांचे निकटवर्तीय आहेत. या बातमीमुळे अजय सिंह यांच्या आई आणि बहिणींच्या पायाखालची जमीन सरकली. अजयचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याची त्यांची खात्री पटली.

यानंतर अजयच्या आईने पोलिसांत तक्रार केली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण अनेक दिवस प्रलंबित ठेवले आणि अखेर ते फेटाळून लावले. निराश झालेल्या अजयच्या आईने उच्च न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. यानंतर, हायकोर्टानेच यूपी एसटीएफला ३१ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालय स्वतः या प्रकरणावर देखरेख करत असल्याने, एसटीएफने वेगाने तपास केला आणि १९ नोव्हेंबर २०२२ रोजी अजय सिंहची कथित पत्नी नीतूला अटक केली.

या चौकशीदरम्यान, नीतूने चुकून या संपूर्ण घटनेचा खुलासा एसटीएफला दिला. त्यानंतर एसटीएफने बाराबंकी येथील निवासस्थानी छापा टाकत गेल्या शुक्रवारी पवन पांडेला अटक केली. या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या एसटीएफ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेमागे पडद्यामागे एक कट होता. नीतू आणि अजयचे लग्नही याच कटाचा एक भाग आहे. लग्नाआधी कौटुंबिक रजिस्टरमध्ये नाव नोंदवण्याचा उद्देश हा होता की अजयच्या मृत्यूनंतर जमिनीची मालकी नीतूकडे येईल. नीतू तिच्या शब्दाला पलटेल म्हणून २ महिन्याआधीच पवन पांडेय याने जमिनीचा व्यवहार मुकेश तिवारी नावावर करून घेतला. या प्रकरणात आतापर्यंत एसटीएफनं १२ जणांना आरोपी बनवले आहे. त्यातील षडयंत्र रचणारा मुख्य आरोपी पवन पांडेय आहे. पवनचा भाऊ राकेश पांडेय हा जलालपूर येथून समाजवादी पार्टीचा आमदार आहे. तर भाचा रितेश पांडे हा बहुजन समाज पार्टीचा खासदार आहे.

Web Title: UP Former MLA Pawan Pandey Arrested For Grabbing Land Worth Crores Through Fraud and Murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.