29 दिवसांपासून फासावर लटकत होता पतीचा मृतदेह, सांगाडा झालेला पाहून पत्नी बेशुद्ध...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:12 PM2023-01-19T14:12:00+5:302023-01-19T14:12:24+5:30
पतीशी भांडणानंतर पत्नी घर सोडून गेली, महिन्याभरानंतर परतल्यावर पतीचा सांगाडा दिसला.
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीचा मृतदेह 29 दिवस फासावर लटकलेल्या अवस्थेत राहिला. इतक्या दिवसात त्याच्या मृतदेहाचा सांगाडाही झाला होता. पतीवर नाराज होऊन घरातून निघून गेलेली पत्नी महिनाभरानंतर परतली आणि पतीचा सांगाडा पाहून बेशुद्ध पडली. ही घटना कानपूरमधील बिल्हौर भागात निर्जन ठिकाणी असलेल्या एका घरात घडली आहे. या भागात सर्वसामान्यांचे येणे-जाणे नगण्य आहे. त्यामुळे 29 दिवसांपासून घरात लटकलेल्या मृतदेहाचा सांगाडा झाल्याचा सुगावाही कोणालाही लागला नाही. सध्या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
आत मृतदेह अन् घराला कुलूप
पोलिसांनी सांगितले की, या तरुणाचा मृतदेह कधीपासून लटकत होता, त्याचा तपास आधी केला जात आहे. त्याने आत्महत्या केली असेल तर त्याच्या घराच्या बाहेरच्या दाराला कुलूप कसे आणि कोणी लावले? कानपूरच्या अरौल पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना घडलेल्या गावाचे नाव गिलवत अमीनाबाद आहे. सुदामा शर्मा (30) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घरात सुदामा पत्नी कीर्ती आणि दोन मुलांसह राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदामा वडील आणि इतर दोन भावांपासून विभक्त झाला होता. हे कुटुंब ज्या घरात राहत होते ते घरही गावाबाहेर आहे. त्यामुळे सुदामाच्या घरी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या भेटी कमी होत्या.
बायको रागावून निघून गेली
पोलिस चौकशीत पत्नी कीर्तीने सांगितले की, 18 डिसेंबर 2022 रोजी तिचे पती सुदामासोबत भांडण झाले होते. त्यानंतर ती मुलांसह उत्तरपुरा येथील मेहुणीच्या घरी गेली. 21 डिसेंबरपर्यंत पती-पत्नी मोबाईलवर बोलत राहिले. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरील संभाषणही बंद झाले. सुदामाने गळफास लावून आत्महत्या केली असेल, तर त्यांच्या घराचे कुलूप कोणी आणि का लावले असेल, याचाही तपास पोलिस करत आहेत. कारण घटनेनंतर पोलिसांना घराबाहेर कुलूप लटकलेले आढळले. पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या घराच्या दारात अशी व्यवस्था आहे की आतून कुलूप लावता येते. पोलीसही या वस्तुस्थितीची पडताळणी करत आहेत.