लग्न झालं, वऱ्हाड घरी आलं पण नवरीचा चेहरा पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 07:27 PM2023-02-05T19:27:01+5:302023-02-05T19:27:13+5:30
मुलीच्या पाठवणीनंतर नवरा नवरीला घेऊन घरी परतला. त्यानंतर नवरीचं स्वागत करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरील पदर उचलण्यास सांगितले.
संभल - मोठ्या थाटामाटात वऱ्हाड निघाले. लग्नाच्या अक्षता पडल्या. सात फेरे घेतले. लग्नाच्या सर्व विधी पार झाल्या. त्यानंतर नवरीला घेऊन नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी आनंदाने घरी पोहचले. इथपर्यंत सर्वकाही ठीक सुरू होते परंतु सासरी आल्यानंतर जेव्हा नवरीला तिचा डोक्यावरील पदर बाजूला करायला सांगितला तेव्हा नवरीचा चेहरा पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आता नवऱ्याने जर मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी दिलीय. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील आहे. संभलच्या हजरत नगरच्या कटौली गावात राहणाऱ्या डालचंद याचे लग्न कैलादेवी परिसरातील एका मुलीसोबत ठरले होते. लग्नात मुलीनं डोक्यावर पदर घेतला होता. प्रथा परंपरेनुसार लग्न झाले. नवरा-नवरीने सात फेरे घेत दोघंही विवाहाच्या पवित्र्या नात्यात अडकले. एकमेकांसोबत सात जन्म एकत्र राहण्याचं वचन दिले. परंतु त्यानंतर जे घडले त्याने धक्काच बसला.
मुलीच्या पाठवणीनंतर नवरा नवरीला घेऊन घरी परतला. त्यानंतर नवरीचं स्वागत करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरील पदर उचलण्यास सांगितले. जेव्हा नवऱ्याकडच्या मंडळींनी सूनेच्या चेहऱ्यावरील पदर हटवला तेव्हा सर्व हैराण झाले. ज्या मुलीसोबत मुलाचं लग्न ठरले होते ती नवरी नव्हती तर पदरेच्या आडून मुलीच्या मोठ्या बहिणीचं लग्न करण्यात आले. बघता बघता हा प्रकार संपूर्ण गावात आणि नातेवाईकांना समजला.
नवऱ्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, छोट्या बहिणीसोबत साखरपुडा झाला तर लग्नही तिच्यासोबत करण्याचं ठरले होते. परंतु लग्न मोठ्या बहिणीसोबत करण्यात आले जिची मानसिक स्थिती ठिक नाही. हा प्रकार पंचायतीसमोर मांडण्यात आला. परंतु काही तोडगा निघाला नाही. शेवटी पोलिसांना यात ओढण्यात आले. हुंड्यासाठी नवऱ्याकडील लोक हा खोटा बनाव रचत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. तर सासरच्यांनी मला फसवलं त्यामुळे मला न्याय हवा, जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन अशी धमकीच नवऱ्याने दिली.