शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 03:57 PM2024-11-27T15:57:53+5:302024-11-27T15:58:53+5:30

मुलाच्या कुटुंबीयांकडे आरोपीने खंडणी मागितली होती. पण कुटुंबीय खंडणी देण्यास असमर्थ ठरले.

up sultanpur kidnapped student murdered by neighbor after not receiving ransom | शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एका निष्पाप मुलाचं त्याच्या शेजाऱ्याने अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी आरोपीने मुलाच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागितली होती. पण कुटुंबीय खंडणी देण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे आरोपीने मुलाचा खून करून मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. पोलीस आता कारवाई करत आहेत.

हे प्रकरण नगर कोतवालीच्या गांधी नगर परिसरातील आहे, त्याच परिसरातील रहिवासी मोहम्मद शकील यांचा ११ वर्षांचा मुलगा ओसामा संध्याकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि परत आलाच नाही. रात्री उशिरापर्यंत बरीच शोधाशोध करूनही काही हाती लागलं नाही. 

कुटुंबीयांकडे यानंतर ५ लाख रुपयांची खंडणीही मागितली गेली. इतके पैसे देण्यास कुटुंबीय असमर्थता व्यक्त करत असल्याने पैसे कमी जास्त देखील करण्यात आले. पोलिसांना खंडणीची माहिती मिळताच त्यांनी वेगाने तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली.

पोलिसांना ठोस माहिती मिळताच त्यांनी शकीलच्या घरासमोर असलेल्या घरावर छापा टाकला. येथील दृश्य पाहून पोलीसही हादरले. ओसामा मृत अवस्थेत पडला होता. सध्या पोलिसांनी आरोपी तरुण आसिफ उर्फ ​​सोनूला त्याच्या घरातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने ऑनलाईन कर्ज घेतलं होतं. कर्ज फेडू न शकल्याने त्याने ओसामाशी मैत्री केली आणि त्याला चॉकलेट खायला देण्याच्या बहाण्याने बोलावलं. खंडणी न मिळाल्याने त्याने मुलाचा गळा दाबून खून केला. आपल्या पलंगाखाली तो मृतदेह लपवला. घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांना संशय येऊ नये म्हणून त्याने कुटुंबीयांसह मुलाचा शोध घेण्याचं नाटक सुरू केलं.
 

Web Title: up sultanpur kidnapped student murdered by neighbor after not receiving ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.