'पोलिसांनी रात्री घरात घुसून मारहाण केली'; UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:59 PM2021-10-01T14:59:58+5:302021-10-01T15:04:57+5:30
तरुणीच्या भावाचे गावातील एका तरुणासोबत भांडण झाले होते, त्याचा तपास करण्यासाठी पोलिस आले होते.
लखीमपूर खेरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यीनीने पोलिसांवर मारहाणीसह घरातील पुस्तके फाडल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरीच्या सदर कोतवाली भागातील अगोश पुरवा गावाचे आहे. गावातील यूपीएससीची तयारी करणाऱ्या प्रांशु शुक्ला या विद्यार्थ्यीने सदर कोतवाली परिसरातील नाकाहा चौकीचे प्रभारी नरेंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या तीन कॉन्स्टेबलवर रात्री 9 वाजता घरात घुसून प्राणघातक हल्ला करत पुस्तके फाडल्याचा आरोप केला आहे. याबाबत विद्यार्थ्यीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रारदेखील दाखल केली आहे.
प्रांशु शुक्ला यांचे म्हणणे आहे की, तिचा मोठा भाऊ कल्लनचे एका तरुणासोबत भांडण झाले होते. या प्रकरणाबाबत नरेंद्र प्रताप सिंह तीन कॉन्स्टेबलसह त्यांच्या घरी रात्री 8 वाजता चौकशी करण्यासाठी आले. चौकशी केल्यानंतर ते परत गेले. त्यानंतर रात्री 9:00 वाजता पुन्हा नरेंद्र प्रताप सिंह त्याच तीन कॉन्स्टेबलसह परत आले.
यावेळी प्रांशुची आई आणि वहिनीदेखील घरात उपस्थित होत्या. पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलला सोबत आणले नव्हते आणि रात्री घरात घुसून पुन्हा चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी प्रांशु यांच्या कानशिलात लगाबली. यात तिचे डोके भिंतीवर आदळल्याने ती जखमी झाली. याबाबत आता प्रांशुने सदर पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, 26 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या घटनेबाबात अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही केला आहे.