Coronavirus: १३ वर्षीय कोरोनाबाधित मुलाला कारच्या डिक्कीत बंद केलं, मग...; कारण ऐकून सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 09:07 AM2022-01-09T09:07:41+5:302022-01-09T09:08:01+5:30
एका निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे. जिने स्वत:च्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलाचा जीव धोक्यात घातला.
वॉश्गिंटन – कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमायक्रॉनचा प्रार्दुभाव इतक्या वेगाने पसरत आहे की, दिवसाला लाखो लोकं संक्रमित आहे. कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वात जास्त वेगाने संक्रमित करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यालाही लगेच कोविड बाधा होते. त्यामुळे माणसांमधील दुरावा वाढला आहे. त्यात एका आईनं मुलासोबत केलेले कृत्य ऐकून तुम्हालाही संताप अनावर होईल.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे. जिने स्वत:च्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलाचा जीव धोक्यात घातला. टेक्सासमध्ये राहणाऱ्या या महिलेने स्वत:ला कोरोनापासून वाचवण्यासाठी ही करकूत केली. ज्यामुळे पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. टेक्सासच्या स्थानिक माध्यमांनुसार, ४१ वर्षीय महिला जिचं नाव सारा बीम असं आहे. तिने तिच्या मुलाला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कारच्या डिक्कीत बंद केले होते. ३ जानेवारीला ही घटना घडली.
ही महिला हैरिस काऊंटीमध्ये चाचणी केंद्रावर पोहचली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, जेव्हा ही महिला गाडी घेऊन आली तेव्हा तिच्या गाडीच्या डिक्कीतून कुणाच्यातरी ओरडण्याचा आवाज येत होता. कारच्या डिक्कीतून कोणीतरी बाहेर येण्यासाठी विनवणी करत होता. त्यानंतर या महिलेला जबरदस्तीने कारची डिक्की खोलण्यास भाग पाडलं तेव्हा आतमध्ये असणाऱ्या मुलाची अवस्था पाहून उपस्थित असणारा प्रत्येक जण हैराण झाला.
वृत्तानुसार, सारा बीमने अधिकाऱ्यांना सांगितले की, माझा १३ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला कारच्या डिक्कीत बंद केले होते. आरोपी शिक्षिका असलेली महिला स्वत:ला कोरोनापासून वाचवण्यासाठी मुलाला डिक्कीत बंद करत कोरोना व्हायरस चाचणी केंद्रावर घेऊन गेली. या चाचणी केंद्रावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केंद्रावर उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जोवर मुलाला कारच्या मागच्या सीटवर बसवत नाही तोवर कोविड टेस्ट करणार नाही असं म्हटलं. तर याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येत महिलेला ताब्यात घेतले.
टेक्सासमध्ये कोरोनाची दहशत
अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर दिवसाला लाखो लोकं बाधित होत असल्याचं समोर येत आहे. सोमवारी अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. एका दिवसात तब्बल १० लाखांहून अधिक रुग्ण आढळत जागतिक नोंद झाली आहे. रविवारी अमेरिकेत ५.९० लाख रुग्ण समोर आले होते. सोमवारी हाच आकडा दुपटीने वाढला. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अमेरिकेत पुन्हा शाळा, कॉलेज बंद करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय उड्डाणावरही निर्बंध आले आहेत.