हेडलीला हवाली करण्यास अमेरिकेचा नकार; मात्र साथीदार राणाचे प्रत्यार्पण शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:01 AM2020-06-28T00:01:04+5:302020-06-28T00:01:26+5:30
लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली.
वॉशिंग्टन : २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यात अमेरिकेत खटला चाललेला आरोपी डेव्हिड हेडली याला भारताच्या हवाली करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. मात्र त्याच खटल्यातील त्याचा सहआरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीवर विचार केला जाऊ शकेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.
लॉस एन्जल्स येथील संघीय न्यायालयात राणा याच्या जामीन अर्जास विरोध करताना अमेरिकी सरकारच्या वतीने सहायक अॅटर्नी जॉन जे, ल्युलेजियान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हेडली व राणा यांची प्रत्यार्पणाच्या बाबतीत तुलना होऊ शकत नाही. हेडलीने अटक होताच सर्व गुन्हे कबूल केले. त्या बदल्यात त्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे. या उभयपक्षी सहमतीमध्ये हेडलीला भारतात न पाठविण्याची मुख्य अट आहे. त्याउलट राणा याने गुन्हे कबूल केलेले नाहीत. शिवाय तो तपासी यंत्रणेला सहकार्यही करीत नाही. त्यामुळे हेडली व आपण यांच्यात भेदभाव केला जात असल्याची तक्रार तो करू शकत नाही. नंतर दाऊद गिलानी असे नाव धारण केलेला हेडली हा अमेरिकी नागरिक आहे. तर राणा हा पाकिस्तानी नागरिक व व्यापारी आहे. तो हेडलीचा बालपणीचा मित्र आहे.
राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीवर अमेरिकी सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. मुंबई हल्ल्यातील सहभागाखेरीज इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये खटला चालविण्यासाठी भारतास तो हवा आहे.