सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षेत डमींचा वापर; आरोपींमध्ये दोन पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 03:00 AM2020-11-29T03:00:21+5:302020-11-29T07:17:18+5:30
दुसऱ्याला बसवून नोकरी मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक प्राप्तिकर खात्यात, तर दुसरा गृहमंत्रालयात
नोएडा (उत्तर प्रदेश) : दिल्ली पोलीस व अन्य सरकारी खात्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या जागी दुसऱ्यालाच बसवून लाखो रुपये लाटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
अपर पोलीस आयुक्त (कायदा-व्यवस्था) लवकुमार यांनी सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये पोलीस भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा सुरू असून, त्यामध्ये परीक्षार्थींच्या जागी त्यांचे ओळखपत्र लावून दुसरेच कोणीतरी परीक्षा देत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांचे आणखी सहा साथीदार बाहेर उभे असल्याची माहिती त्यांनी दिली. यात दिल्ली पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली.
या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात त्यांनी सांगितले की, दिनेश जोगी व प्राप्तिकर खात्यातील त्याचे निरीक्षक मामा रवीकुमार व गृहमंत्रालयातील त्याचे साथीदार अरविंद ऊर्फ नॅन हे मिळून एक टोळी चालवीत आहेत. सध्या संरक्षण मंत्रालयात एएसओ या पदावरील नोकरी मिळविण्यासाठी दिनेशने दुसऱ्याच कुणाला तरी बसवून नोकरी मिळविली. आगामी काही दिवसांत तो नोकरीवर रुजू होणार आहे. या टोळीतील दिल्ली पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलचे काम या टोळीला प्रश्नपत्रिका सोडवून देणारा उपलब्ध करून देण्याचे आहे. आतापर्यंत या टोळीने १०० पेक्षा अधिक लोकांना फसवणुकीद्वारे इतर खात्यांमध्ये नोकरी मिळवून दिली आहे.
अपर आयुक्तांनी सांगितले की, सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली युवकांकडून ही टोळी १० लाखांपासून २० लाखांपर्यंत रक्कम उकळत होते. अटक केलेल्यांकडून एकूण २,१०,००० रुपये नगदी, अनेक मोबाईल फोन, तीन आलिशान कार, दिल्ली पोलिसांचे दोन गणवेश व बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या टोळीचा म्होरक्या रवीकुमार व गृहमंत्रालयातील अरविंद हे फरार आहेत. पोलीस त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत.