औषध निर्मितीच्या कच्च्या मालाचा ड्रग्ज बनवण्याकरिता वापर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 09:14 AM2022-08-06T09:14:49+5:302022-08-06T09:15:11+5:30
कंपनीच्या परिसरात चित्रीकरणास मज्जाव, पोलिसांचे सर्च ऑपरेशन
- पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : नालासोपारा येथे १४०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अंबरनाथच्या खासगी नमाऊ केम कंपनीत गुरुवारी रात्री सर्च ऑपरेशन केले. ही कंपनी औषध निर्मितीकरिता १४ प्रकारचा कच्चा माल तयार करत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करीत आहे. या केमिकल कंपनीतून एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केल्याचा संशय आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या पथकाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
अंबरनाथच्या ज्या केमिकल कंपनीमध्ये पोलिसांनी कारवाई केली, ती कंपनी गेल्या४० वर्षांपासून औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याचे काम करीत आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा येथे मोठी कारवाई करत
१४०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले. या प्रकरणातील मुख्य आरोपीला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी सायंकाळी अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत असलेल्या नमाऊ केम कंपनीत दाखल झाले होते. तब्बल चार तास या कंपनीत मुंबई पोलिसांच्या पथकांनी सर्च ऑपरेशन केले. कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या कारवाईबाबत पथकाच्या प्रमुखांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच कंपनीच्या परिसरात चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला. या कंपनीचे एमडी ड्रग्जसोबतचे नेमके कनेक्शन काय आहे हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली असली तरी ज्या पद्धतीने पोलिसांचा कंपनीच्या परिसरात तपास सुरू होता त्यावरून या कंपनीचे थेट
कनेक्शन गुन्हेगारांसोबत असल्याची चर्चा होत आहे.
औषध निर्मितीसाठी लागणारा तब्बल १४ प्रकारचा कच्चा माल या ठिकाणी तयार केला जातो. प्युअर ग्रेट केमिकल तयार करण्यात या कंपनीचे राष्ट्रीय बाजारपेठेत चांगले नाव आहे.
देशातील नामांकित औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अंबरनाथच्या नमाऊ केम कंपनीतून कच्चा माल मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजारात या कंपनीचा माल निर्यात केला जातो.
या कारवाईबाबत कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.