मध्यप्रदेशच्या शस्त्र माफियांकडून युवकांचा गुन्हेगारीसाठी वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:31 PM2024-04-20T14:31:50+5:302024-04-20T14:32:04+5:30
३० महिन्यात ४२ देशी कट्टे, ३० मॅगझीन, १९७ काडतूस हस्तगत
- अझहर अली
संग्रामपूर : मध्य प्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांची तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या गोरखधंद्यातील मास्टरमाईंडला शोधून जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. संग्रामपूर तालुक्यात २० नोव्हेंबर २०२१ पासून १८ एप्रिल २०२४ या अडीच वर्षांच्या कालावधीत विविध कारवायांमध्ये ४२ देशी कट्टे, ३० मॅगझीन तसेच १९७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मध्यप्रदेशच्या शस्त्र माफियांकडून युवकांचा गुन्हेगारीसाठी वापर करण्यात येत आहे.
२० नोव्हेंबरला २०२१ ला झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथे मध्यप्रदेशातील तीन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून १४ देशी पिस्तूल व १६० जिवंत काडतुसे जप्त केली. ९ डिसेंबर २०२१ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने आदिवासी ग्राम जूनी वसाली येथील पूलावर मध्यप्रदेशातील दोन आरोपींकडून ३ देशी कट्टे व ६ जिवंत काडतुसे जप्त केली. १ फेब्रुवारी २०२३ ला स्थानिक गून्हेशाखेच्या पथकाने तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत टूनकी कडून शेगाव कडे जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला एकलारा फाट्याजवळ थांबवून चौकशी केली. त्याच्याकडून देशी बनावटी पिस्टल तसेच ४ जिवंत काडतूसे जप्त केली.
३ जून २०२३ ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या कारवाईत १४ देशी पिस्टल, २५ मॅगझीन, ८ जीवंत काडतुसे हस्तगत केले. २३ फेब्रुवारी २०२४ ला सोनाळा पोलिसांनी ग्राम टुनकी बु. येथील केदार नदीच्या पूलावर सापळा रचून हरियाणा राज्यातील नुहू जिल्ह्यातील सिंगार, पुन्हाना येथील एका आरोपीचे मुसक्या आवळल्या. या आरोपीकडून ६ देशी कट्टे, १ मॅक्झिन, १ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. नुकतेच १८ एप्रिलला सापडा रचून सोनाळा पोलीसांनी मध्यप्रदेशातील ४ आरोपींकडून ४ पिस्तूल ४ मॅक्झिनसह १७ जिवंत काडतुसे जप्त केल्याने मध्यप्रदेशातून संग्रामपूर तालुक्यात घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घातक हत्यारांची तस्करीतील मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यात बुलढाणा जिल्हा पोलिस दलाला अपयश आल्याने परप्रांतीय गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही.