क्विंटलला १५ रुपये नफ्यासाठी विकले वापरलेले हातमोजे, सुपरवायझरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:25 AM2020-09-16T01:25:52+5:302020-09-16T01:26:09+5:30
नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी देशभरात जुने हातमोजे विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे.
नवी मुंबई : वापरलेले हातमोजे विक्रीप्रकरणी पोलिसांनी सहाव्या व्यक्तीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. तो केरळच्या अमृता हॉस्पिटलमधील बायो वेस्ट मॅनेजमेंटचा सुपरवायझर आहे. क्विंटलमागे १५ रुपये नफ्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये वापरलेले हातमोजे साठवून विक्री करत होता.
नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी देशभरात जुने हातमोजे विक्री करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये आजतागायत पाच जणांना अटक झाली असून, त्यांच्याकडून ४८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. यानुसार, शनिवारी धीरज हृषिकेशनला कोचीनच्या एर्नाकुलम भागातून अटक करण्यात आली आहे. कोचीनमधल्या अमृता हॉस्पिटलचा बायो वेस्ट मॅनेजमेंटचा सुपरवायझर आहे. कोचीनमधल्या अमृता हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून निघणाऱ्या बायो वेस्टची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. रुग्णालयातून निघणाºया बायो वेस्टमधून तो हातमोजे वेगळे करून साठवायचा. त्यानंतर, मागणी करणाऱ्यांना हा माल महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुरवला जात होता. त्यापैकी सर्वाधिक मोठा साठा औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीमध्ये करण्यात आला होता. तिथून तो भिवंडी व नवी मुंबईत पुरवला गेला होता.
तीनशे किलो हातमोजे जप्त
कोरोनामुळे प्रत्येक कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाला हातमोजांची गरज भासू लागल्याने, जुने हातमोजे पुन्हा विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये धीरज सहभागी झाला. एर्नाकुलम भागातून त्याने विक्रीसाठी साठवलेले ३०० किलो जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत. त्याला प्रत्येक १०० किलोमागे १५ रुपये नफा मिळत होता, अशी कबुली दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या रकमेचा फायदा त्याने उचलला असल्याचीही शक्यता आहे.