भयंकर! सॅनिटायझरच्या बॉटलमध्ये कॅमेरा, ऑनलाईन परीक्षेत लीक करायचे पेपर; 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:53 PM2022-03-09T20:53:54+5:302022-03-09T20:55:16+5:30
Crime News : सॅनिटायझरच्या बाटलीत हिडन कॅमेरा लावून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा केंद्रात प्रवेश करवून देत होते.
नवी दिल्ली - बिहारमधील पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. ऑनलाईन परीक्षेत प्रश्न लीक करणाऱ्या सॉल्वर गँगच्या चार गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. ही मंडळी सॅनिटायझरच्या बाटलीत हिडन कॅमेरा लावून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा केंद्रात प्रवेश करवून देत होते. येथे विद्यार्थी कॅमेऱ्यावर प्रश्नपत्रिका पाहत होता आणि गुन्हेगार एनी डेस्क सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सिस्टम हॅक करून बाहेरून उत्तर सबमिट करवून देत होते. हा गोंधळ सर्वाधिक रेल्वे परीक्षांमध्ये केला जात होता. आरआरबी एनटीपीसी परीक्षेतही गुन्हेगारांनी अशा प्रकारचा कारनामा केला होता.
मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यातही यापैकी एका गुन्हेगाराचा समावेश होता. एसएसपी मानवजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये नालंदा येथील अश्विनी सौरभ, तनिष्क कुमार, रुपेश कुमार आणि शिवशंकर कुमार यांचा समावेश आहे. यांचा प्रमुख अश्विनी सौरभ हा आहे. हे लोक दर दोन महिन्यांनी आपला फ्लॅट बदलत होते आणि नव्या फ्लॅटमध्ये आपल्या ऑफिसचा सेटअप करीत होते. येथूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना यांच्या फ्लॅटमधून 18 लाख 78 हजार रुपयांची कॅश सापडली आहे. विविध विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपी करण्यातून हे पैसे मिळाले होते. सोबतच 19 हार्ड डिस्क आणि 7 लॅपटॉप, 4 सीपीयू, 3 मदर बोर्ड, 5 वायफाय राऊटर, 2 एडॅप्टर, 1 मॉनिटर, पेन ड्राइव्ह, 1 आयपॅड, 12 मोबाईल आणि 10 हिडन कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.
ऑनलाईन परीक्षा केंद्राच्या बाहेर जॅमर लावलेले आहेत. मात्र गुन्हेगारांनी यावरही उपाय शोधून काढला होता. ते जॅमर फ्री हार्ड डिस्कचा उपयोग करीत होते आणि परीक्षा सेंटरच्या सीटी हेडसह मिळून हार्ड डिस्कलो सेंटरच्या सर्व्हरमध्ये इन्सर्ट करवून घेत होते. यामुळे त्यांचे आयपी एड्रेस हॅक करून आपल्या फ्लॅटच्या खोलीतून परीक्षा देण्यास सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी आत फक्त बसून होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.