डेटिंग ॲप वापरताय? सावधान! श्रद्धा आणि आफताबची भेटसुद्धा अशाच डेटिंग ॲपवर झाली होती...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 01:21 PM2022-11-15T13:21:36+5:302022-11-15T13:22:26+5:30

डेटिंग ॲपवर प्रेम, नंतर लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नाची मागणी झाल्यावर खून. हे आहेत श्रद्धा मर्डर केसचे तीन टप्पे! यावरून डेटिंग ॲपबद्दल जागृती होणे आवश्यक झाले आहे. 

Using a dating app? Beware! Shraddha and Aftab also met on a similar dating app...! | डेटिंग ॲप वापरताय? सावधान! श्रद्धा आणि आफताबची भेटसुद्धा अशाच डेटिंग ॲपवर झाली होती...!

डेटिंग ॲप वापरताय? सावधान! श्रद्धा आणि आफताबची भेटसुद्धा अशाच डेटिंग ॲपवर झाली होती...!

googlenewsNext

वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर नातेसंबंधांमध्येही झपाट्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. दुर्दैवाने हे बदल स्वागतार्ह नसून समाजाला अधःपतनाकडे नेणारे आहेत. त्याचेच विकृत स्वरूप म्हणजे श्रद्धा मर्डर केस. डेटिंग ॲप बनवण्याचा हेतू भेटी गाठी हा होता, मात्र त्याचे दुष्परिणाम जास्त दिसून येत असल्याने या ॲप्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

पूर्वी लग्न समारंभ, कौटुंबिक सोहळे, शाळा, कॉलेज, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांच्या भेटी गाठी होत व त्यातून ओळख वाढत असे. मोबाईल क्रांती झाल्यापासून आबाल वृद्धांच्या हाती मोबाईल आणि इंटरनेट आले. कोणी काय बघावे आणि काय नाही यावर कोणाचा धरबंद राहिला नाही. घरात इन मिन चार माणसं पण चौघेही चार दिशेला अशी स्थिती! संवादाचा अभाव, नवीन नात्यांची ओढ, सोशल मीडियावरचे आभासी जग यामुळे तरुणांमध्ये  डेटिंग ॲपबद्दल कमालीचे कुतूहल जागृत झाले आणि त्यांची सक्रीयताही वाढली. 

या ॲपवर तरुण तरुणी फोटो, माहिती वाचून समोरील व्यक्तीला डेट करायचे की नाही हे ठरवतात. मात्र तिथे दिलेली माहिती खरी असतेच असे नाही. हे कळत असूनही त्या जाळ्यात अडकून अनेकांनी आपल्या आयुष्याची वाताहत केल्याचे बातम्यांमधून कळते. आर्थिक, मानसिक, शारीरिक हिंसाचाराला इथल्या मंडळींना सामोरे जावे लागल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. श्रद्धाच्या निमित्ताने त्या पुन्हा चर्चेत आल्या. 

डेटिंग ॲपवर श्रद्धा आफताबची ओळख ते मृत्यूचा प्रवास:

श्रद्धा मध्यमवर्गीय मराठी घरातली चांगले शिक्षण घेतलेली मुलगी. तिची आणि आफताबची भेटही डेटिंग ॲपद्वारे झाली होती. श्रद्धा कॉल सेंटरमध्ये नोकरीला तर आफताब फूड ब्लॉगर होता. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. भेटी गाठी झाल्या. आकर्षण वाढलं. आफताबच्या यापूर्वीही चार प्रेमिका होत्या, हे माहीत असूनही श्रद्धा त्याच्या प्रेमात वाहवत गेली. घरच्यांचा विरोध असल्याने ते दिल्ली येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि श्रद्धाने लग्नासाठी विचारणा केली असता तिला मारहाण केली, शिवीगाळ केला आणि त्या वादातून आफताबने श्रद्धाचा मर्डर केला. शेफ असल्याने त्याने सहजपणे ३५ तुकड्यांमध्ये तिच्या शरीराची खांडोळी केली. फ्रिज विकत घेतला आणि त्यात तुकडे साठवून जंगल परिसरात फेकला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना वाचून लोकांचा थरकाप उडाला आहे, तर श्रद्धाच्या घरच्यांची कल्पनाच केलेली बरी!

डेटिंग ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या:

  • देशात ३० दशलक्षहून अधिक भारतीय डेटिंग ॲप्स वापरतात.
  • यापैकी ६७ टक्के वापरकर्ते पुरुष आणि ३३ टक्के वापरकर्ते महिला आहेत.
  • एका डेटिंग ॲप सर्व्हेमध्ये असेही आढळून आले आहे की, जेन झेड म्हणजे २००० नंतर जन्मलेले लोक. अशा १० पैकी ९ तरुणांना डेटिंग ॲप्सद्वारे मित्र मैत्रिणी शोधण्याची गरज वाटते!
  • कोरोना काळात तरुणांमध्ये डेटिंग ॲप्सचा वापर अधिक वाढला आहे.
  • एकट्या भारतातून डेटिंग ॲप्सना ५१५ कोटी रुपये वार्षिक कमाई होत आहे.
  • डेटिंग ॲप्ससाठी भारत ही जगातील चौथी मोठी बाजारपेठ आहे.
  • भारतात डेटिंग ॲप्सचे २० दशलक्षाहून अधिक सशुल्क सदस्य आहेत.
  • २०१७ मध्ये, २५ ते ३४ वयोगटातील ५२ टक्के तरुण डेटिंग ॲपवर होते.

प्रश्न येतो डेटिंग ॲप्सच्या विश्वासार्हतेचा!

>>डेटिंग ॲप वाईट नाही, मात्र त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही!

>>डेटिंग ॲपवर घाईघाईने मैत्री करणे आणि वाहवत जाणे जीवावर बेतू शकते. 

>>समोरची व्यक्ती गोड बोलते याचा अर्थ ती सभ्य आहे असे नाही, कदाचित हा फसवण्याचा डाव असू शकतो. 

>>डेटिंग ॲपवर गप्पा मारून एकमेकांशी बोलण्याची सवय होऊ शकते, प्रेम नाही! 

>>आकर्षणाला प्रेमाचे लेबल देण्याआधी थांबा, विचार करा, काही दिवस संपर्क तोडा, जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील. 

>>डेटिंग ॲपवर सगळेच चांगल्या हेतूने येतात असे नाही, लोकांच्या भावनांशी खेळून त्यांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुन्हेगार हा मार्ग अवलंबतात. 

>>कितीही झाले तरी घरचे किंवा बालपणापासूनचे मित्र, मैत्रीण, नातलग आपल्याला आणि आपण त्यांना व्यवस्थित ओळखतो, असे असताना अनोळखी व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. ते शाब्दिक मलम काही काळापुरते बरे वाटू शकेल परंतु त्याचे दूरगामी परिणाम वाईट असू शकतील. 

बॉलिवूडमधील चित्रपट पाहून प्रेमाच्या कल्पना आखू नका. कितीही झाले तरी रील लाईफ आणि रिअल लाईफ यात भेद असतोच. चित्रपटात व्हिलन असला तरी त्याला मारायला हिरो असतोच. खऱ्या आयुष्यात हिरोच व्हिलनच्या भूमिकेत गेला तर दोष कुणाचा? सावध व्हा, ताकही फुंकून प्या!

Web Title: Using a dating app? Beware! Shraddha and Aftab also met on a similar dating app...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.