4 वर्षांपर्यंत लव्ह, सेक्स आणि नंतर लग्नाला नकार; पीडित शिक्षिका थेट प्रियकराच्या घरी पोहोचली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:10 PM2022-11-14T21:10:10+5:302022-11-14T21:11:06+5:30
संबंधित युवती एका खासगी शाळेत शिक्षिका आहे...
अयोध्येतील पुराकलंदर भागतील एका गावातून, एका दलित शिक्षिकेसोबत फसवणूक करत चार वर्षांपर्यंत लैंगिक अत्याचार केल्याची आणि नंतर लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर, संबंधित शिक्षिका थेट फसवणूक करणाऱ्या प्रियकराच्या घरी पोहोचली आणि तेथे आरडा ओरड करत धरणे दिले. हे संपूर्ण दृष्य पाहून आरोपी प्रियकर घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडित शिक्षिकेला पोलीस ठाण्यात आणले. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर, आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित युवती एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. हुसेपूरमधील मजरे विट्ठलपूर येथील रहिवासी जगन्नाथ पिंटू वर्मा याने संबंधित शिक्षिकेचे लग्नाचे आमिष दाखवत चार वर्षे लैंगिक शोषण केले. मात्र, जेव्हा पीडितेने त्याच्याकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याने तिला नकार दिला, असा आरोप आहे. यानंतर पीडितेने शाळेत शिकवण्यासाठी जाणे बंद केले होते. संबंधित शिक्षिका साधारणपणे 20 दिवसांपूर्वी पिंटूच्या घरीही पोहोचली होती, मात्र पिंटूच्या घरच्यांनी तिला हकलवून लावले. शिक्षिका रात्री दहा वाजता घरून निघाली आणि शाळेसमोर जाऊन रेल्वे ट्रॅकवर आत्महत्येसाठी झोपली. हा संपूर्ण प्रकार शाळेच्या चौकीदाराने पाहिल्यानंतर काही लोकांनी तिला ट्रॅकवरून बाजूला केले.
साधारणपणे आठवडाभरापूर्वी संबंधित शिक्षिकेने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर, पीडित शिक्षिका शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरी पोहोचली आणि धरणे धरून बसली. हे पाहून आरोपी पिंटू वर्मा घरातून पळून गेला. पीडितेचा भाऊ जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा आरोपीच्या घरच्यांनी त्याला जातिवाचक शब्द वापरले आणि एसयूव्हीची मागणी पूर्ण केल्यानंतर, लग्न करू असे म्हणाले.
यानंतर, पीडितेचे वडील पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहोचले. यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तब्बल नऊ तासांनंतर पीडित शिक्षकेस घेऊन पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक कृष्ण कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंटू वर्माविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर, त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल. अयोध्येचे अधिकारी प्रकरणाची चौकशी करतील.