बदायूंमध्ये 2 चिमुकल्यांची निर्दयी हत्या, आरोपी साजिद रक्तही प्यायला! थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:30 PM2024-03-20T13:30:10+5:302024-03-20T13:30:45+5:30
अशी घडली संपूर्ण घटना, हत्येनंतर जावेद तेथेच उभा होता...!
बदायूं - उत्तर प्रदेशातील बदायूं येथून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनास्थळीही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दोन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपी साजिदला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. यानंतर, पोलिसांनी लवकरात लवकर दुसरा आरोपी असलेल्य जावेदचेही एन्काउंटर करावे, तेव्हाच मला न्याय मिळेल, असे आपल्या काळजाचे तुकडे गमावलेल्या आईने म्हटले आहे.
साजिदने 11 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांची निर्दयी हत्या केल्यानंतर परिसरात सन्नाटा पसरला आहे. काही माध्यमांतील वृत्तांनुसार, पीडित कुटुंबाने या संपूर्ण घटनाक्रमाला जादू-टोण्याशी जोडले आहे. एवढेच नाही, तर साजिदने हत्या करून मुलांचे रक्तही प्यायले. त्याच्या तोंडाला मांसाचे तुकडे लागलेले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस या आरोपांचा तपास करत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
जन्माला येताच मरण पावली होती साजिदची 5 मुलं -
या दुहेरी हत्याकांडामागे काही जादू-टोण्याचा प्रकार असू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे. आरोपी साजिदने एकदा, आपली पाच मुले जन्माला येताच मरण पावली, एकही बचावले नाही, असे संगीताला सांगितले होते. आता पुन्हा जिल्हा महिला रुग्णालयात पत्नीची प्रसूती आहे. यासाठी त्याने संगीताकडून पाच हजार रुपयेही उसने घेतले होते. त्याने छतावर जाऊन मुलांची हत्या केली. महत्वाचे म्हणजे, या घटनेमागे जुने वैमनस्यही असू शकते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र या दुहेरी हत्येचे नेमके कारण काय? हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.
अशी घडली संपूर्ण घटना, हत्येनंतर जावेद तेथेच उभा होता -
यासंदर्भात स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन्ही मुलांच्या हत्येनंतर आरोपी जावेद तेथेच उभा होता. एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे की, मंडी समिती चौकीजवळ नवीन बाबा कॉलनी विकसित झाली आहे. या वसाहतीत पाण्याच्या टाक्या बांधणारे कंत्राटदार विनोद कुमार हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुले आहेत. त्याची पत्नी ब्युटी पार्लरचे काम करते. पत्नी संगीताने दिलेल्या माहितीनुसार, शेजारीच सलून चालवणारे आरोपी साजिद आणि जावेद त्यांच्या घरी आले. आरोपीने सर्वप्रथम संगीताकडून 45 रुपयांचे सामान खरेदी केले. यानंतर पत्नीच्या उपचारासाठी 5 हजार रुपये घेतले. यावेळी संगीताने आरोपी साजिदला चहा दिला, आरोपीने चहा घेण्यास सुरुवात केली. यावेळी दुसरा आरोपी जावेद बाहेर बसला होता. चहा घेत आरोपी साजिद घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि तिथेच त्याने विनोदच्या दोन्ही मुलांवर चाकू आणि वस्तऱ्याने हल्ला केला.