अपमानित महिलेला घाबरायला हवं...! फेसबुक पोस्ट लिहून भाजप महिला नेत्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 07:40 PM2022-04-27T19:40:29+5:302022-04-27T19:44:18+5:30
फेसबुकवर स्वत:च्या मृत्यूची भविष्यवाणी करत महिला भाजप नेत्याची आत्महत्या
बांदा: उत्तर प्रदेशातील बांद्यामध्ये भाजपच्या महिला नेत्यानं आत्महत्या केली आहे. गळफास लावून महिला नेत्यानं जीवन संपवलं. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नेत्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. महिलेचा पती सध्या फरार आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. श्वेता सिंह असं भाजप नेत्याचं नाव आहे. मृत्यूच्या २० तासांपूर्वी श्वेता यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी आपल्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टींबद्दल संकेत दिले होते. श्वेता यांची अखेरची फेसबुक पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.
श्वेता सिंह गौर या बांदातील जसपुरा क्षेत्राहून जिल्हा पंचायतीच्या सदस्या होत्या. माजी आयपीएस अधिकारी राजबहादूर सिंह हे श्वेता सिंह यांचे सासरे लागतात. श्वेता सिंह गौर सोशल मीडियावर खूप सक्रीय असायच्या. श्वेता यांनी त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली होती.
श्वेता सिंह गौर पती दीपक सिंह गौरसोबत सासऱ्यांच्या घरी राहायच्या. पती पत्नी भाजपशी संबंधित आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. गेल्या रात्रीदेखील दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर श्वेता सिंह यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी श्वेता सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. घायाळ नागीण आणि वाघीण, अपमानित महिलेला घाबरायला हवं, असं श्वेता सिंह यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. श्वेता यांच्या आत्महत्येनंतर पती दीपक सिंह फरार आहे. पोलिसांनी श्वेता यांचा मोबाईल जप्त केला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.