उत्तर प्रदेश बार कौन्सिल अध्यक्षाची कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:10 PM2019-06-12T20:10:58+5:302019-06-12T20:12:19+5:30
उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षा दरवेश यादव यांची आग्रा येथे कोर्टाच्या परिसरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
आग्रा - उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षा दरवेश यादव यांची आग्रा येथे कोर्टाच्या परिसरातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरवेश यादव यांच्यावर गोळी झाडणारी व्यक्तीसुद्धा पेशाने वकील असून, त्यानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. दरम्यान, आरोपीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
३८ वर्षीय दरवेश यादव यांची दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान, आज आग्रा येथील दिवाणी कचेरीमध्ये त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमादरम्यान आरोपी वकिलाने त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, या वकिलाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे. त्याची ओळख मनीष शर्मा अशी आहे.
President of UP Bar Council Darvesh Yadav shot dead in Agra. She was elected as the President of UP Bar Council two days back.
— ANI UP (@ANINewsUP) June 12, 2019
आग्र्याचे एडीजी अजय आनंद यांनी सांगितले की, आरोपी मनीष याने कौन्सिल अध्यक्ष दरवेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्या दरवेश यांच्या डोक्यावर आणि पोटात लागल्या. गंभीर जखमी झालेल्या दरवेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपी वकिलाने दरवेश यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत:च्याही डोक्यात झोळी झाडून घेतली. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे २००४ मध्ये वकिलीच्या पेशात आल्यापासून दरवेश या आग्रा येथे आरोपी वकील मनीष याच्यासोबत एकाच ऑफिसमध्ये काम करत होत्या. तसेच बार कौन्सिलच्या निवडणुकीमध्येही मनीष याने दरवेश यांना संपूर्ण पाठिंबा दिला होता.