“मामापासून वाचवा, आमच्या जीवाला धोका”; प्रेमविवाह केल्यानंतर BJP आमदाराच्या भाचीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:28 AM2021-06-01T07:28:20+5:302021-06-01T07:33:57+5:30
भाचीने प्रेमविवाह केल्यानंतर आता तिने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावरून एक व्हिडीओ जारी केला आहे.
कौशांबी – काही वर्षापूर्वी बरेली येथील भाजपा आमदाराची मुलगी साक्षी मिश्राने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. ज्यावरून खूप मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून असंच एक प्रकरण समोर येत आहे. कौशांबीचे भाजपा आमदार लाल बहादूर यांची भाची लग्नाच्या एक दिवसाआधीच घरातून पळून गेली. त्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न केले आहे.
भाचीने प्रेमविवाह केल्यानंतर आता तिने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावरून एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ते मामा आमदार लाल बहादूर आणि भावापासून जीवाचा धोका असल्याचं म्हणत आहेत. इतकचं नाही तर आमच्यासोबत ऑनर किलिंग होऊ शकते त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्यात यावी अशी विनवणी ते दोघं सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगलाने घरातून पळून जाऊन कानपूरच्या आर्य समाज मंदिरात लग्न केले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार भाचीने सांगितले की, २४ मे रोजी तिचं लग्न होणार होतं. परंतु त्याच्या एक दिवस आधीच ती घरातून पळाली. घरातून पळाल्यानंतर तिने प्रियकरासोबत कानपूर येथे २८ मे रोजी लग्न केले. माझे मामा आमदार आहेत. त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे. मुलीने व्हायरल केलेल्या व्हिडीओत मामा आणि भावापासून जीवाला धोका असल्याचं सांगत पोलीस प्रशासनाकडे सुरक्षेसाठी मदत मागितली आहे.
प्रेमी युगलाने लग्नानंतर बनवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माहितीनुसार, ही मुलगी पदवीधर आहे. तर तिचा प्रियकर फक्त आठवी पास झालेला आहे. या मुलीचं लग्न सरकारी शाळेतील एका शिक्षकासोबत ठरलं होतं. परंतु प्रियकरासाठी तिने घरातून पळून जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. पोलिसांनी मुलाच्या कुटुंबावर दबाव आणला. त्यानंतर प्रियकर-प्रेयसी घरी परतले. त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि त्याचठिकाणी या दोघांनी व्हिडीओ बनवला आहे. दुसरीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून भाजपा आमदार लाल बहादूर यांनी या प्रकरणात हात वर केले आहे. हा व्हिडिओ बनावट असून मला याबाबत काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.