'उंदीर हत्या' प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर ट्विस्ट...; हत्या नाही, आधीपासूनच फुफ्फुस-लिव्हर होतं खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:16 PM2022-12-01T12:16:47+5:302022-12-01T12:18:29+5:30
आयव्हीआरआयचे ज्वॉइंट डायरेक्टर डॉक्टर केपी सिंह यांनी म्हटले आहे, की देशात उंदराचे पोस्टमॉर्टम होण्याची ही पहिलीच वेळ...
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्यात उंदीर हत्या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर, नवा खुलासा झाला आहे. बरेलीच्या आयव्हीआरआयमध्ये वैज्ञानिकांनी उंदराचे पोस्टमॉर्टम केले. यात, उंदराचा मृत्यू नाल्याच्या पाण्यात बुडून नाही, तर गुदमरल्यामुळे झाला आहे. उंदराचे फुफ्फूस आणि लिव्हर आधीपासूनच अत्यंत खराब होते. यामुळे, उंदीर अधिक काळ जगणे अशक्य होते. असेही यात सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सदर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कल्याणनगर भागातील पशू मित्र विकेंद्र शर्मा हे 25 नोव्हेंबरच्या दुपारी बदायूंच्या गांधी मैदान चौकाजवळून जात होते. यावेळी त्यांना मनोज कुमार नावाचा एक युवक उंदराच्या शेपटीला दगड बांधून, त्याला नाल्यात बुडवताना दिसला. हे पाहताच त्यांनी तत्काळ नाल्यात उडी मारून उंदराला वाचवले. मात्र, तोवर त्या उंदराचा मृत्यू झाला होता. यानंतर, विकेंद्रने या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली.
यानंतर पोलिसांनी मृत उंदराला सील केले आणि बदायूंतील पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथील स्टाफने संसाधनांच्या कमतरतेमुळे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यावर, फिर्यादीच्या अर्जानंतर, पोलिसांनी उंदराचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बरेली येथील आयव्हीआरआयमध्ये पाठवला आहे. आयव्हीआरआयचे ज्वॉइंट डायरेक्टर डॉक्टर केपी सिंह यांनी म्हटले आहे, की देशात उंदराचे पोस्टमॉर्टम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केपी सिंह म्हणाले, पोस्टमॉर्टमनंतर उंदराच्या इतर अवयवांची माइक्रोस्कोपच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. पॅथॉलॉजिस्ट डॉ.अशोक कुमार आणि डॉ.पवन कुमार यांनी उंदराचे शवविच्छेदन केले. यात, नाल्यातील पाण्यातील घाणीचे अवशेष फुफ्फुसात आढळले नाहीत. उंदराचा मृत्यू गुदमरून झाला नाही. उंदराचे फुफ्फुस आणि लिव्हर आधीच खराब झाले होते आणि उंदराला अनेक आजार होते. यामुळे तो वाचण्याची शक्यता फारच कमी होती, असे आढळून आले.