आधी मुलीवर बलात्कार, मग निर्घृण हत्या; हाडं मोडून प्लास्टिकच्या पिशवीत टाकला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:59 PM2021-09-05T12:59:13+5:302021-09-05T13:00:29+5:30
पोलिसांचा वेगवान तपास, न्यायालयानं दिला निकाल; मृत मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केलं समाधान
उत्तर प्रदेश: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. स्त्रीसोबत झालेला असा अपराध कोणत्याही धर्म किंवा संस्कृतीला मान्य नाही, असं या खटल्याचा निकाल देताना विशेष न्यायाधीश डॉ. पल्लवी अग्रवाल यांनी म्हटलं. आरोपी अशोक कुमारला फाशीसोबतच १.४० लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये ४ ऑगस्टला अंगावर काटा आणणारी घटना घडली. पोलिसांनी त्याच रात्री आरोपीला अटक केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपीची रवानगी कोठडीत केली. १८ सप्टेंबर २०२० रोजी पोलिसांनी न्यायालया आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयानं अशोक कुमारला फाशीची शिक्षा सुनावली.
हाडं मोडून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरला
घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी आरोपीनं केलेलं कृत्य पाहून हादरले होते. अशोकनं लहान मुलीवर बलात्कार करून त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. त्यानं हाडं मोडून मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकला आणि मग ती पिशवी फेकून दिली. घटनास्थळी मिळालेली प्लास्टिकची पिशवी, शवविच्छेदन अहवाल, मृत मुलीच्या बहिणीची साक्ष, मृत मुलीचा स्लाईड अहवाल या सर्व बाबी खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.
लेकीला न्याय मिळाला; वडिलांनी व्यक्त केली भावना
१३ महिन्यांनंतर लेकीला न्याय मिळाल्याची भावना मृत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. आता आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलिसांची कारवाई, त्यानंतर न्यायालयानं दिलेला निकाल यामुळे पोलीस, न्याय व्यवस्थेवरील आमचा विश्वास आणखी वाढला असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.