Uttar Pradesh Crime: मुलीला गाडलं तर मुलाला शेतात फेकून दिलं; ऑनर किलिंगच्या घटनेनं युपीत खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 08:48 PM2022-08-28T20:48:59+5:302022-08-28T20:50:01+5:30
Uttar Pradesh Crime: प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना दोघांची निर्घृण हत्या केली.
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून ऑनर किलिंगचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने कुटुंबीयांनी प्रेमी युगुलाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घराजवळ जमिनीत गाडला, तर मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांची हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घराजवळील जमिनीत गाडला आणि मुलाचा मृतदेह गावाबाहेरील उसाच्या शेतात फेकून दिला. शेतमालकाने मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीसा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तरुणाच्या शरीरावर ओरखडे व जखमांच्या गंभीर खुणा दिसल्या. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृत व्यक्ती त्याच गावातील रहिवासी असल्याचे समोर आले.
असा झाला खुलासा
पोलिसांच्या चौकशीत मृताच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा रात्रभर बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईलही बंद होता. रात्री कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो काही सापडला नाही. मृत मुलगा गावातील एका व्यक्तीच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याच्या घरी येणे-जाणे असायचे. यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर मालकाच्या घरी जाऊन पाहिले असता त्याच्या मुलीचाही मृत्यू झाल्याचे समजले.
मुलीचा मृतदेह काढला
मृत मुलीला घराजवळ पुरण्यात आले होते. तेव्हापासून मुलीचे संपूर्ण कुटुंब फरार आहे. तपासादरम्यान मयत मुलगा आणि मुलगी यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याचे समोर आले. मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांची हत्या करून ते पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा पुरलेला मृतदेह पोलिसांनी जमिनीतून बाहेर काढला, तिच्याही अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून, गावातील तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम 302, 201, 34 आयपीसी आणि एसी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.