तब्बल ११३ महिलांची तक्रार, ३६ जिल्ह्यांतील पोलीस मागावर; 'तो' आरोपी अखेर सापडलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:53 PM2022-05-10T17:53:55+5:302022-05-10T17:54:13+5:30
तब्बल ३६ जिल्ह्यांच्या पोलिसांना हवा असलेला आरोपी अखेर गजाआड
कौशांबी: उत्तर प्रदेशातील कौशांबीमधून रविंद्र राणा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचा शोध ३६ जिल्ह्यांचे पोलीस घेत होते. त्याच्याविरोधात ११३ महिलांनी तक्रार दाखल केली होती. महिलांना फोन करून त्रास देणाऱ्या रविंद्रला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अटक टाळण्यासाठी रविंद्र राणा सतत त्याचं लोकेशन आणि सिमकार्ड बदलत होता. गावाबाहेर जाऊन रविंद्र महिलांना फोन करायचा. शेतात जाऊन फोन करून झाल्यावर रविंद्र गावात यायचा आणि फोन बंद करायचा. मोबाईलवरून कोणतेही १० नंबर डायल करून तो बोलायचा.
मोबाईलवरून कोणतेही १० नंबर डायल केल्यावर रिंग वाजायची. समोरून महिलेचा आवाज आल्यास रविंद्र बोलू लागायचा आणि पुरुषाचा आवाज ऐकू आल्यास कॉल कट करायचा. वूमन पॉवर लाईनवर आलेल्या तक्रारींचा आढावा पोलिसांनी घेतला. अनेक जिल्ह्यांमधील महिलांनी रविंद्रच्या तक्रारी केल्याचं पोलिसांना समजलं.
लखनऊपासून कानपूर, आंबेडकरनगर, वाराणसी, बलरामपूर, झाशी, गोंडा, महाराजगंज, हमीरपूरसह ३६ जिल्ह्यांचे पोलीस रविंद्रचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात एकट्या लखनऊमध्ये १९ तक्रारी दाखल आहेत. याशिवाय उन्नव, कानपूर, आंबेडकरनगरात प्रत्येकी ७, प्रयागराजमध्ये ६, सीतापूर आणि रायबरेलीत प्रत्येकी ५ तक्रारींची नोंद आहे.