ऑन ड्युटी हवालदाराची हत्या करणारे कुख्यात आरोपी एनकाउंटरमध्ये ठार; युपी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 04:42 PM2023-05-14T16:42:14+5:302023-05-14T16:43:18+5:30
आरोपींनी 10 मे रोजी कर्तव्यावर असलेल्या हवालदाराची गोळ्या झाडून हत्या केली होती.
उत्तर प्रदेशातून एनकाउंटरची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील जालौन जिल्ह्यात कॉन्स्टेबल भेडजीत हत्याकांडातील फरार गुन्हेगारांची आज दुपारी पोलिसांशी चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी एका आरोपीचा जागीच खात्मा केला, तर एका आरोपीला गोळी लागल्याने घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या चकमकीत ओराईचे इन्स्पेक्टरही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार दिवसांपूर्वी 10 मे रोजी आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबल भेदजीत यांची गोळ्या घालून हत्या केली होती. कॉन्स्टेबलच्या हत्येनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. जिल्ह्याच्या एसपींपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसपींना लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेण्यास सांगितले होते, तेव्हापासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते.
आज ओराई कोतवाली पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी फॅक्टरी एरिया पोस्ट परिसरात लपून बसले आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना घेराव घातला आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिस पथकानेही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या गोळीबारादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आरोपीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा रुग्णालयात मरण पावला.