डीजेवर असं गाणं वाजलं की लग्नासाठी आलेले वऱ्हाडी आणि कुटुंबीयांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:05 IST2024-12-10T14:04:30+5:302024-12-10T14:05:34+5:30
लग्नाची वरात घेऊन नवरदेव जेव्हा वधूच्या घरी पोहोचला तेव्हा काही कारणांवरून वाद झाला.

डीजेवर असं गाणं वाजलं की लग्नासाठी आलेले वऱ्हाडी आणि कुटुंबीयांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाची वरात घेऊन नवरदेव जेव्हा वधूच्या घरी पोहोचला तेव्हा काही कारणांवरून वाद झाला. डीजेमध्ये अश्लील गाणी लागली आहेत असं म्हणत दारूच्या नशेत असलेल्या लग्नातील पाहुण्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
लग्नघरात या घटनेमुळे शोककळा पसरली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बघेलापूर गावात ही घटना घडली असून, सोमवारी पाकसराय चरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोज यांच्या घरी लग्नाची वरात आली होती. एका पूजेदरम्यान अश्लील गाणी लागली. त्यामुळे लग्नातील पाहुणे आणि कुटुंबीयांमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
वाद इतका वाढला की, दारूच्या नशेत लग्नात आलेले पाहुणे आणि कुटुंबीय यांच्यात जोरदार हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. नवरीला वाचवण्यासाठी गेलेला बबलू हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. बबलूला तीन मुलं आहेत. ही माहिती मिळताच कुटुंबात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी एएसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. बबलू पासी हा कोखराज येथे आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेले होते. डीजेच्या तालावर नाच-गाण्यावरून लग्नातील पाहुणे आणि कुटुंबीय यांच्यात भांडण झाल्याने ही भयंकर घटना घडली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल.