UP Crime News: धक्कादायक! PUBG गेमसाठी आईवर झाडल्या 6 गोळ्या; तीन दिवस मृतदेहासोबत राहिला, नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 10:44 AM2022-06-08T10:44:21+5:302022-06-08T10:44:57+5:30
UP Crime News: लखनौमध्ये एका 16 वर्षीय मुलाने आईवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करुन घटनेची माहिती दिली.
लखनौ: लखनौमधून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. PUBG खेळण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षीय मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. एवढंच नाही, तर हत्येनंतर तो तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच राहिला. 10 वर्षांच्या बहिणीलाही धमकावून घराबाहेर पडण्यापास रोखले. अखेर मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंध पसरली त्यानंतर मुलाने लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना फोन करुन आईची हत्या केल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री वडिलांच्या माहितीवरुन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.
नवीन कुमार सिंग हे मूळचे वाराणसीचे असून ते लष्करात कनिष्ठ आयोग अधिकारी आहेत. त्यांची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आहे. लखनौच्या पीजीआय भागातील यमुनापुरम कॉलनीत त्यांचे घर आहे. त्यांची पत्नी साधना (40 वर्षे) 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षीय मुलीसोबत राहत होती. मुलाने मंगळवारी रात्री वडील नवीन यांना व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे सांगितले. तसेच मृतदेह वडिलांना दाखवला. नवीनने एका नातेवाईकाला फोन करुन लगेच त्याच्या घरी पाठवले. पोलिस आल्यावर घरातील परिस्थिती पाहून तेदेखील थक्क झाले.
गेम खेळण्यास मनाई केल्याने हत्या
एडीसीपी काशिम आब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय होती, मात्र साधना त्याला गेम खेळण्यापासून रोखत असे. शनिवारी रात्रीही त्यांनी आपल्या मुलाला गेम खेळण्यास मनाई केली. यामुळे मुलगा संतापला आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास साधना गाढ झोपेत असताना त्याने कपाटातून वडिलांचे पिस्तूल काढले आणि आईवर गोळ्या झाडल्या. यानंतर बहिणीला धमकावून त्याच खोलीत बंद केले.
भावाच्या भीतीने आईच्या मृतदेहासोबत झोपली
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी बाहेरचे गेट उघडले असता घरातून घाण वास येत होता. नाकाला रुमाल बांधून पोलीस कसेतरी आत शिरले तेव्हा साधनाचा कुजलेला मृतदेह बेडवर पडला होता. मृतदेह इतका कुजला होता की चेहरा ओळखणे कठीण झाले होते. साधना यांची 10 वर्षांची मुलगीही त्याच खोलीत रडत होती. मुलाने बहिणीसमोरच आईवर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ती इतकी घाबरली की भावाच्या सांगण्यावरून ती आईच्या मृतदेहाजवळ झोपली.
आईवर सहा गोळ्या चालवल्या
साधना यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना नवीनचे परवाना असलेले पिस्तूल सापडले. पिस्तुलाची मॅगझीन पूर्णपणे रिकामी होती. मुलाने आईवर मॅगझिनच्या सर्व सहा गोळ्या झाडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, मृतदेह कुजलेला असल्याने शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण दिसत नव्हते. पोलिसांनी मुलाची खूप चौकशी केली, पण त्याने किती गोळ्या झाडल्या हे सांगितले नाही. यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, लहान बहिणीला काकांकडे पाठवले आहे.