मुख्तार अन्सारीचा शूटर संजीव जीवाची लखनऊ कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात आला होता हल्लेखोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:05 PM2023-06-07T17:05:42+5:302023-06-07T17:06:28+5:30
हल्लेखोर येथे वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळीच अटकही करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये कुख्यात गुन्हेगार संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लखनऊ न्यायालय परिसरात ही घटना घडली. जीवाला अनेक गोळ्या लागल्या आहेत. यात दोन इतर लोकांनाही गोळ्या लागल्या आहेत. यात एका मुलाचाही समावेश आहे. त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
हल्लेखोर येथे वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळीच अटकही करण्यात आली आहे. या घटनेमुळे संतप्त वकिलांनी दगडफेक केली. दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत.
संजीव जीवा हा मुख्तार अन्सारी आणि मुन्ना बजरंगी गँगशी संबंधित होता. भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येतही संजीव जीवाचे नाव आले आहे. मात्र, नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. संजीव हा पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वात कुख्यात गुन्हेगार असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपासून तो लखनौ कारागृहात होता. त्याला येथूनच एका खटल्यासाठी न्यायालयात नेण्यात आले होते. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर, आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही संजीव माहेश्वरीने व्यक्त केली होती.
भाजपचे बडे नेते माजी मंत्री ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतही जीवाचा हात होता. द्विवेदी यांची 10 फेब्रुवारी 1997 रोजी लोहाई रोडवर गोळी मारून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने लखनऊ न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. 17 जुलै 2003 रोजी सीबीआय न्यायालयाने माजी आमदार विजय सिंह आणि शामली जिल्ह्यातील आमदपूर गावचा रहिवासी असलेल्या शूटर संजीव महेश्वरी उर्फ जीवा या दोघांनाही आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.
संजीवची पत्नी पायल हिने 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाशांना पत्र लिहून पतीच्या पेशीदरम्यान हत्येच्या कटाची शंका व्यक्त करत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती.