पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:51 AM2021-08-31T11:51:21+5:302021-08-31T11:55:02+5:30
पत्नी पीडित पतीनं नोंदवली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; व्यथा मांडताना अश्रू अनावर
ललितपूर: पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पतीनं आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. पत्नीपासून वाचवा, मला न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन, अशा शब्दांत पीडित पतीनं त्याची व्यथा मांडली. पत्नी प्रचंड त्रास देते. वर पोलिसात तक्रार दाखल करते. त्यामुळे पोलीस मला पकडून नेतात. मी मजूर करून पोट भरतो. पोलिसांनी सतत पकडून नेल्यावर पोट कसं भरायचं, खायचं काय, घर कसं चालवायचं, असे प्रश्न पीडित पतीनं उपस्थित केले.
उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधल्या भदैयापुरा येथे राहणारा बृजेश कुमार त्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे गेला. रडवेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या बृजेशला तिथे उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींनी त्याला असलेली समस्या विचारली. आपली व्यथा मांडताना बृजेश ओक्साबोक्सी रडू लागला. रडत रडतच त्यानं त्याची समस्या सांगितली.
जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...
'माझी पत्नी प्रचंड त्रास देते. त्यामुळे मी एसपींना भेटायला आलो होतो. पत्नी दररोज भांडते. वर माझ्याच विरोदात पोलिसात तक्रार दाखल करते. जवळपास १० ते १५ वेळा पोलिसांनी मला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. पत्नी सतत वाद घालते. पैसे काढून घेते. माझ्या कुटुंबातील सदस्यांशीदेखील ती वारंवार भांडत राहते,' अशी व्यथा पीडित पतीनं मांडली.
'आजच पत्नीनं मला आपटलं, मारलं, मला चावली. अनेकदा पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी घरी येऊन समजवण्याचा प्रयत्न केला. मला न्याय हवाय. अन्यथा मी इथेच मरेन. मला न्याय मिळाला नाही, तर मला इथेच मरावं लागेल. मी मजुरी करून कुटुंबाचं पोट भरतो. पण पत्नी सतत भांडत असल्यानं प्रचंड मनस्ताप होतो. तिच्या तक्रारीनंतर पोलीस मला पकडून नेतात. मजुरी केली नाही तर माझ्या कुटुंबानं खायचं काय?', असा प्रश्न पीडित पतीनं रडत रडत विचारला.