गंगाखेडमधून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली उत्तर प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:55 PM2018-07-16T17:55:05+5:302018-07-16T18:01:12+5:30
शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले आहे.
गंगाखेड (परभणी ) : शहरातून अपहरण झालेल्या सोळा वर्षीय मुलीस अपहरणकर्त्यासह उत्तर प्रदेशातुन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान अपहरणकर्त्यास न्यायालयाने बुधवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील सोळा वर्षीय मुलीचे दि. २ जुलै २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास तिच्या राहत्या घरून अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच दिवशी संध्याकाळी अज्ञात अपहरणकर्त्या विरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान अपहत सोळा वर्षीय मुलगी जळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भाऊसाहेब मगरे, पो.ना. निलेश जाधव, जमादार साहेब मानेबोईनवाड, मपोशि मनिषा केंद्रे, मपोशि मिरा पवार यांच्या पथकाने जळगाव येथे अपहत मुलीचा शोध घेतला मात्र ती मिळुन आली नाही.
यानंतर पोलिसांना अपहारणकर्त्याने मुलीस उत्तर प्रदेशात नेल्याची माहिती मिळाली. तेंव्हा पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश राज्यातील संत कबीर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहोली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोउपनि भाऊसाहेब मगरे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३ ) कुडिया या गावातुन अपहत मुलीस ताब्यात घेतले. तसेच तिला फूस लावून पळवुन नेणाऱ्या यशवंत रामरूप चौधरी (२४, रा. कुडिया) यास ताब्यात घेण्यात आले.
आरोपी चौधरी यास पोलिसांनी रविवारी (दि. १५) गंगाखेड पोलीस ठाण्यात आणले. मुलीची वैद्यकीय तपासणी करून अपहरणाच्या गुन्ह्यात ३७६ बाल लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम ३, ४, ७, ८, ११, १२ चे कलम वाढवुन आरोपी चौधरी यास अप्पर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास बुधवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पो.नि. सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भाऊसाहेब मगरे, पोना निलेश जाधव हे करत आहेत.