कपाळाला लाल टिळा, अन्नपाणी सोडलं; बंद खोलीतून २ महिलांसह ५ मुले रेस्क्यू, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 04:14 PM2023-04-04T16:14:27+5:302023-04-04T16:14:55+5:30
सर्वांच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा होता. २-४ दिवसांपासून कुणीही अन्न-पाणी घेतले नव्हते.
शाहजहांपूर - शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एकाच कुटुंबातील ७ जणांना रेस्क्यू केले आहे. ज्यात २ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. मागील २-३ दिवसांपासून हे कुटुंब एकाच खोलीत अन्न पाणी न घेता बंद होते. या सर्वांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. तंत्र-मंत्राच्या माध्यमातून या सर्वांनी स्वत:ला या खोलीत बंद केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
सध्या पोलिसांनी या सर्वांना रेस्क्यू करत हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ज्याठिकाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण तिलहरच्या बहादुरगंज पोलीस ठाण्यातील आहे. बनारसी नावाच्या व्यक्तीच्या घरी मागील २-३ दिवसांपासून काहीच हालचाल दिसली नाही. शंका आल्यावर स्थानिकांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.
शेजारी राहणाऱ्या शैलेंद्र शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा सीढी लावून लोक घरातील खोलीत उतरले तेव्हा सर्व आतमध्ये बंद होते आणि खोलीचा दरवाजा आतून बंद होता. सर्वजण एकमेकांशी काहीतरी संवाद साधत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३ वेगवेगळे टाळे तोडले त्यानंतर मुख्य खोलीचा टाळा तोडला. त्या खोलीत २ महिलांसह ५ मुले पडली होती. त्यांना तात्काळ रेस्क्यू करण्यात आले.
या ७ जणांना हॉस्पिटलला पोहचवले. घटनेनंतर परिसरात लोकांची गर्दी झाली होती. तंत्र-मंत्राच्या विद्येमुळे सर्वांनी स्वत:ला खोलीत बंद केले होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. सर्वांच्या कपाळावर लाल रंगाचा टिळा होता. २-४ दिवसांपासून कुणीही अन्न-पाणी घेतले नव्हते. जर वेळेआधीच या सर्वांना रेस्क्यू केले नसते तर या सर्वांचा जीव जाण्याची शक्यता होती. यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सजर अहमद यांनी म्हटलं की, या सर्वांची मानसिक स्थिती ठीक नाही. कुटुंबातील ३ सदस्यांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना मेडिकल कॉलेजला रिफेर केले आहे असं त्यांनी सांगितले. परंतु या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.