डिजे बंद करण्यास सांगितल्याने शेगाव पोलिस ठाण्यात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 12:43 PM2022-02-07T12:43:32+5:302022-02-07T12:47:13+5:30
Vandalism at Shegaon police station : ५ ते ६ जणांनी ठाण्यात येऊन पोलिसांशी बाचाबाची केली.
शेगाव (बुलडाणा) : वाढदिवसानिमित्त उत्तररात्री एक वाजतानंतर डिजे सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलिसांनी शहरातील विश्वनाथ नगरमध्ये घरमालकास तो बंद करण्याचे सांगितल्याच्या कारणावरून जमावाने पोलिस ठाण्यात येत खुर्च्या, टेबलची फेकाफेक, उपस्थित अंमलदार, पोलिसांना लोटपाट तसेच मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह चार पुरूषांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत, असे खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल काेळी यांनी सांगितले. शहरातील विश्वनाथ नगर भागात उत्तररात्रीनंतरही डिजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शहर पो स्टे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे सहकाऱ््यांसह विश्वनाथ नगरमध्ये गस्तीवर गेले. त्यावेळी एका ठिकाणी डिजे सुरू असल्याने संबंधिता घरमालकास डि जे बंद करण्यास सांगितला. पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा डिजे सुरूच असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे रात्री सव्वा वाजता पुन्हा पोलीस घटनास्थळी गेले. एकास ताब्यात घेत ठाण्यात आणले. त्यानंतर ५ ते ६ जणांनी ठाण्यात येऊन पोलिसांशी बाचाबाची केली. त्यामध्ये दोन महिलांसह चार पुरूषांचा समावेश होता. त्यांनी स्टेशन डायरीवरील ठाणे अमलदारास लोटपोट केली. तसेच टेबल खुर्च्याची फेकफाक व तोडफोड केली. त्यात ठाणे अंमलदारास खांद्याला मार लागल्याची माहिती आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी घटनेची फिर्याद दिली. त्यानुसार झाडेगाव येथील आरोपी बळवंत चिंतामण बाभूळकर (३१), भारत अर्जून बाभूळकर, नरेश अर्जून बाभूळकर, विश्वनाथ नगर, सुनील बाबूराव खंडेराव (३०) कारंजा रमजानपूर यांच्यासह दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी शहर ठाण्यात भेट दिली. पोलीस आरोपीच्या शोधात असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले