वाराणसीत दिवसाढवळ्या एन्काऊंटर! दोन डझनहून अधिक गुन्हे अन् २ लाखांचं बक्षिस असलेल्या गुंडाचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:31 PM2022-03-21T15:31:24+5:302022-03-21T15:33:15+5:30
उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुन्हेगाऱ्यांचा काळ्या कमाईवर बुल्डोजर चालवल्यानंतर आता फरार आरोपींचा थेट एन्काऊंटर करण्यास सुरुवात झाली आहे. वाराणसीत दिवसाढवळ्या २ लाखांचं बक्षीस असलेल्या गुंड मनीष सिंह सोनू याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे.
मनीष सिंह सोनू याच्यावर दोन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्याचा अखेर आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं खात्मा केला आहे. एनडी तिवारी हत्याकांडासह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मनीष सिंह सोनू याचा सहभाग होता. त्याच्यावर जौनपूर, गाजीपूर, वाराणसी आणि चंदौली येथे एकूण मिळून दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल होते.
गेल्या अनेक वर्षांपासून होता फरार
मनीष सिंह सोनूचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस स्वरुपात दोन लाख रुपये दिले जातील असं अलिकडेच जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता. २८ ऑगस्ट २०२० रोजी मनिष सिंह यानं चौकाघाट येथे दिवसाढवळ्या हिस्ट्रीशीटर अभिषेक सिंह प्रिंस यांच्यासह दोन जणांची हत्या केली होती. याआधी मनिष सिंह आझमगढ येथील एका सराफा व्यावसायिकाची लूटमार आणि खून प्रकरणात फरार होता. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये मिर्झापूरच्या चुनार येथील कंपनी अधिकाऱ्याकडून खंडणी व हत्येच्या प्रकरणात मनीष सिंग सोनूचे नाव समोर आले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिसांनी मनिषला जैतपुरा परिसरात घेरलं होतं. या चकमकीत रोशन गुप्ता उर्फ बाबू उर्फ किट्टू मारला गेला, तर मनीष पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
सोनू बिहार आणि नेपाळमध्ये लपून बसत होता
नोव्हेंबर २०२० नंतर पोलीस सोनू याचा मागोवा घेत होते. पण तो काही हाती लागत नव्हता. यूपी पोलिसांच्या माहितीनुसार, मनिष बिहार आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. तो सातत्यानं त्याचं ठिकाण बदलत होता. जवळपास दीड वर्षांनंतर पोलिसांना मिळालेल्या टिपनुसार सोनू आज वाराणसीत असल्याचं कळलं.
STF नं दिवसाढवळ्या केला एन्काऊंटर
सोनूची माहिती मिळताच यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं त्याला घेरलं. यावेळी मनिष सिंह यानं पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तो गोळीबारात ठार झाला. त्याच्याकडून ९ एमएम कारबाइन, ३२ बोर ची पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात भाजपा सरकारचं पुनरागमनानंतरचा हा पहिलाच मोठा एन्काऊंटर आहे. ज्यात एक मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाला आहे.