Varsha Sanjay Raut at ED Office: वर्षा राऊत ईडी कार्यालयात; संजय राऊतांना समोरा समोर बसवून चौकशीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 11:21 AM2022-08-06T11:21:36+5:302022-08-06T11:21:59+5:30
५५ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. त्यांना शुक्रवारी समन्स पाठविण्यात आला होता. संजय राऊत यांची आणि वर्षा यांची समोरासमोर चौकशी केली जाण्य़ाची शक्यता आहे.
Maharashtra | Shiv Sena MP Sanjay Raut's wife, Varsha Raut arrives at the ED office in Mumbai. She has been summoned by the agency in connection with the Patra Chawl land case. pic.twitter.com/44DbrB0HUw
— ANI (@ANI) August 6, 2022
१,०३४ कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ११२ कोटी रुपये प्राप्त झाले होते. यापैकी ५५ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र, ईडीने राऊत यांना १ जुलै रोजी पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यापूर्वीच वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये हे माधुरी राऊत यांना परत केल्याचे दिसून आले होते.
५५ लाखांचे गौडबंगाल
हे ५५ लाख रुपये पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना मिळालेल्या पैशांतीलच असून याच पैशांचा वापर वर्षा राऊत यांनी दादर येथील फ्लॅट खरेदीसाठी केल्याचा दावा ईडीने केला आहे. दादर येथील फ्लॅट ईडीने यापूर्वीच जप्त केला आहे. याच प्रकरणी ईडीला आता वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे.