वरुण इंडस्ट्रीजचा कॅनरा बँकेलाही ११८ कोटींचा गंडा; कर्जाचे दुबई कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 06:43 AM2023-08-26T06:43:19+5:302023-08-26T06:44:54+5:30
सेन्ट्रल बँक ऑफ इंडियालाही घातलाय तब्बल २६९ कोटी रुपयांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाला तब्बल २६९ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या वरुण इंडस्ट्रीजने कॅनरा बँकेला देखील ११८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती हाती आली असून या प्रकरणी देखील सीबीआयने कंपनी व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सेंट्रल बँकेप्रमाणेच कॅनरा बँकेकडूनही कंपनीने कर्ज घेत त्या पैशांची अफरातफर दुबईस्थित दोन कंपन्यांशी केल्याचे दिसून आले आहे. कंपनीने भांड्याच्या निर्यातीसाठी कॅनरा बँकेकडून १२४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, संबंधित कंपनी स्टील भांडे निर्यातीत व्यवसायच करत नसल्याचे तपासणीमध्ये आढळले.
कॅनरा बँकेच्या कर्जाचे दुबई कनेक्शन
सेंट्रल बँकेकडून मिळालेल्या कर्जातील पैसे वरुण इंडस्ट्रीजने दुबईतील दोन कंपन्यांसोबत व्यवहार केल्याचे दाखवले होते. मात्र, दुबईतील या दोनही कंपन्या कंपनीशीच संबंधित असल्याचे सेंट्रल बँकेच्या तपासात आढळून आले होते. याच दोन कंपन्यांसोबत कॅनरा बँकेकडून कर्जापोटी मिळालेल्या रकमेचा वापर कंपनीने केल्याचे दिसून आले आहे. कंपनीने हे पैसे प्रथम दुबईतील या दोन कंपन्या आणि नंतर तेथून पुन्हा मूळ कंपनीत वळविले का, याचा आता तपास सुरू आहे.