वसईत ११ कोटी ५८ लाखांचा २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:40 IST2025-04-07T17:40:00+5:302025-04-07T17:40:30+5:30
नायजेरियनला अटक, गुन्हे शाखा २ ची कारवाई

वसईत ११ कोटी ५८ लाखांचा २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडल्याने खळबळ
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : वसईच्या एव्हरशाईन परिसरात ११ कोटी ५८ लाख ४१ हजार १०० रुपये किंमतीचा २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रॉन व ४८ ग्रॅम कोकेन सापडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली असून एका नायजेरियन आरोपीला अटक केल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. आरोपीला वालीव पोलिसांच्या ताब्यात तपास व चौकशीसाठी देण्यात आले असल्याचेही सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींची माहीती घेवून त्यांचेवर कारवाई काण्याचे अनुशंगाने माहीती घेणे चालू होते. ५ एप्रिलला रात्री सव्वा बारा वाजता गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून वसईच्या एव्हरशाईनसिटी परिसरातील फरशी कारखान्याचे जवळील महेश अपार्टमेंटमध्ये एक व्हिक्टर नावाचा परदेशी नागरीक अंमली पदार्थांचा साठा करून गि-हाईकांना विक्री करीत असल्याची खात्रीलायक बातमी प्राप्त झाली.
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदाराचे पथकाने एव्हरशाईन सिटीतील महेश अपार्टमेंटच्या तिसरा मजल्यावर छापा मारला. या कारवाईत आरोपी व्हिक्टर ओनुवाला उर्फ डाईक रेमंड (३७) याच्या राहते घराची झडती घेतली. त्याचे घरातून ४८ ग्रॅम कोकेन व त्याचे स्वतःचा डाईक रेमंड या नावाचा बनावट पासपोर्ट मिळून आला.
आरोपी व्हिक्टरच्या घरझडती दरम्यान मिळालेल्या चावीचे आधारे सदर बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावरील रुममधून २२ किलो ८६५ ग्रॅम मेफेड्रोन मिळाला. तसेच अंमली पदार्थाचे गुणवत्तेत बदल करणेकरीता वापरले जाणारे केमिकल मिळून आल्याने ते जप्त केले. नमुद रुमचे झडती दरम्यान नायजेरिया देशाच्या ईग्वेनुबा लेगॉस याचा पासपोर्ट मिळून आल्याने त्याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.