वसई विरार गुटख्याचा अड्डा, पुन्हा ८० लाखांचा गुटखा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 07:09 PM2018-09-05T19:09:29+5:302018-09-05T19:10:32+5:30
आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
वसई - वसई विरार शहरात बंदी असलेल्या गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असून गुजरातमधून छुप्या मार्गाने गुटखा शहरात आणला जात आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई विभागाने महामार्गावरील खानिवडे येथे एका ट्रकवर कारवाई करून ८० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गेल्या काही दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
राज्यात गुटख्यावर बंदी असूनही वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात आहे. गुजरातमधून एक ट्रक गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्रीपासून खानिवडे टोल नाक्यावर सापळा लावला होता. बुधवारी हा ट्रक येतात पोलिसांनी ट्रक अडवून तपासणी केली असता त्याच्यात ६० लाखांचा गुटखा आढळून आला. विविध कंपन्यांचा गुटखा ट्रकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. हा गुटखा मीरारोडला नेत असल्याची माहिती ट्रकचालकाने पोलिसांना दिली. वसई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर दोन ट्रक जप्त करून एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. पुढील कारवाईसाठी जप्त केलेला गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.