वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:16 PM2019-10-02T23:16:28+5:302019-10-02T23:20:28+5:30
मोबाईलमधील फोटोमुळे ‘त्या‘ घटनेचा उलगडा
नवी मुंबई - सागर विहार परिसरात तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झालेच नसून, स्वेच्छेने हा प्रकार घडल्याचा निकष पोलीसांनी तपासअंती लावला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलमध्ये घटनास्थळावरील फोटोवरुन पोलीसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यामुळे घडलेले प्रकरण दडपण्यासाठी त्याने अत्याचाराचा बनाव केला असल्याचेही पोलीसांचे म्हणणे आहे.
वाशीतील सागर विहार परिसरात आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व अमानुष कृत्य घडल्याची तक्रार तुर्भेतील तरुणाने केली होती. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरवात केली. मात्र तरुणाच्या तक्रारीत व तपासात समोर आलेल्या बाबींमध्ये तफावत दिसून येत होती. अशातच पोलीसांच्या पाहणीत सागर विहार परिसरातच समलैंगिक संबंधाचा अड्डा उघडकीस आला. ज्या प्रकारे तरुणावर अत्याचार झालेला होता, त्याच प्रकारच्या वस्तु त्या अड्डयावर पोलीसांना आढळून आल्या आहेत. तर त्याच वस्तु पिडीत तरुणाच्या मोबाईलमधील फोटोत दिसून येत आहेत. यावरुन संपुर्ण प्रकार सागर विहारच्या झाडीत झाला नसुन, परिसरातल्या पडिक इमारतीमध्ये झाल्याचा निकष पोलीसांनी लावला आहे. तसेच त्याच्यावर अत्याचार झाला नसुन स्वेच्छेतून संपूर्ण प्रकार घडला असल्याचाही तर्क पोलीसांनी लावला आहे. तपासादरम्यान पोलीसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये सागर विहार परिसरातील पडिक इमारतीमधील समलैंगिकांच्या अड्डयातले फोटो आढळून आले. त्याद्वारे घटनेची वेळ देखिल पोलीसांना कळलेली आहे. मात्र तक्रारीत तरुणाकडून ज्या घटनेचा उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये व प्रत्यक्षात तपासात समोर आलेल्या बाबीत तफावत असल्याचे वाशी पोलीसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. मात्र वाशीत ज्याठिकाणी समलैंगिकांचा अड्डा चालत होता, त्याठिकाणी जमणाऱ्यांचा
शोध घेवून कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.