ठेला लावण्यावरून वाद, केक दुकानदाराकडून भाजीविक्रेत्याची हत्या

By योगेश पांडे | Published: November 28, 2023 11:17 PM2023-11-28T23:17:35+5:302023-11-28T23:17:49+5:30

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले.

Vegetable vendor killed by cake shopkeeper over dispute over stalling in Nagpur Crime News | ठेला लावण्यावरून वाद, केक दुकानदाराकडून भाजीविक्रेत्याची हत्या

ठेला लावण्यावरून वाद, केक दुकानदाराकडून भाजीविक्रेत्याची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवडाभरात नागपुरात आणखी एका हत्येची घटना घडली आहे. केकच्या एका दुकानदाराने भाजीविक्रेत्याला मारहाण केली व त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीतून ठेला लावण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची बाब समोर आली असून रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभुदयाल भैय्यालाल सराटे (४०, पुनापूर रोड) असे मृतकाचे नाव आहे. तो किरायाने राहत होता व त्याच्या घराजवळच भाजीचा ठेला लावायचा. तो जेथे ठेला लावायचा त्याच्या मागे काही दुकाने आहेत. त्यात आरोपी गजानन वाडणकर याचे केकचेदेखील दुकान होते. प्रभुदयालच्या ठेला लावण्यावर दुकानदाराला हरकत होती. मात्र त्यांच्यात याअगोदर कधीही वाद झाला नव्हता.

मंगळवारी त्यांच्यात वाद झाला व गजाननने प्रभुदयालला शिवीगाळ केले. त्यावर त्यानेदेखील प्रत्युत्तर दिले. त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले व गजाननने लाकडी दांड्यासारख्या वस्तूने सराटेच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यात सराटे गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील लोकांनी या प्रकाराची पारडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व आरोपी गजाननला ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत पंचनाम्याची कारवाई व आरोपीची चौकशी सुरू होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली.

Web Title: Vegetable vendor killed by cake shopkeeper over dispute over stalling in Nagpur Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.