मीरारोड: वाहनांतील सायलेन्सर चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे १८ गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:15 PM2022-02-02T19:15:08+5:302022-02-02T19:16:41+5:30
टोळीने आता पर्यंत १८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाहनांचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला अटक केली असून तपासात टोळीने आता पर्यंत १८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
इको चारचाकी वाहनाचे सायलेन्सर चोरीच्या गुन्हयात वाढ होत असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ . महेश पाटील व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सपोनि अमोल आंबवणे, दत्तात्रय सरक व नितीन बेंद्रे, उपनिरीक्षक कैलास सोनावणे सह चंद्रकांत पोशिरकर, मते, राणे, तावरे, यादव, केंद्रे, काळे, पाटील, वेल्हे, श्रीवास्तव, जगताप, पवार, गायकवाड यांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करत गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे टोळीची माहिती मिळवली .
ती टोळी मीरारोडच्या हटकेश चौक भागात येणार असल्याची माहिती मिळाल्या नंतर पोलीस पथकाने सापळा रचून २३ जानेवारी रोजी इम्रान ईरशाद खान (३५) ; शाहरुख नसीम खान (२४) व जावेद बशीर खान (२८) सर्व रा. घाटकोपर, मुंबई यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये सायलेन्सरचे पार्ट व ते कापण्या करिता लागणारे साहीत्य सापडले.
पोलिसांनी तिघांची कसून चौकशी सुरु केली असता त्या टोळीने आचोळे पोलीस ठाणे हद्दीत ४ ; नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत २, तुळींज व विरार पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे ८ गुन्हे एकट्या नालासोपारा व विरार भागात केल्याचे उघडकीस आले. नवी मुंबई आयुक्तालयातील खारघर, कौपरखैरणे व रबाळे पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २ तर कामोठे हद्दीत ४ असे एकूण १० गुन्हे केले आहेत . ह्यात आणखी एक आरोपी सैबान ह्याचा शोध सुरु आहे. गुन्ह्यातील सायलेन्सरचे पार्ट, सायलेन्सर चोरी करण्यासाठीचे वापरत असलेले साहीत्य व गुन्हे करण्यासाठी वापरलेली कार असा ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.